बँकेचा ऑपरेटरच द्यायचा कागदपत्रांशिवाय बनावट आधार कार्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 6, 2021 04:08 IST2021-02-06T04:08:20+5:302021-02-06T04:08:20+5:30
पोलिसांनी केला पर्दाफाश, गुन्हा दाखल पोलिसांनी केला पर्दाफाश; गुन्हा दाखल लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : बँकेकड़ून आधार कार्ड नोंदणीसाठी ...

बँकेचा ऑपरेटरच द्यायचा कागदपत्रांशिवाय बनावट आधार कार्ड
पोलिसांनी केला पर्दाफाश, गुन्हा दाखल
पोलिसांनी केला पर्दाफाश; गुन्हा दाखल
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : बँकेकड़ून आधार कार्ड नोंदणीसाठी नेमलेला ऑपरेटर दलालाच्या मदतीने कागदपत्रांंशिवाय बनावट आधार कार्ड बनवून देत असल्याची धक्कादायक माहिती गुन्हे शाखेच्या कारवाईतून समोर आली आहे. एका आधार कार्डसाठी ५ ते ७ हजार रुपये उकळले जात होते.
बोरीवली पश्चिमेकडील चामुंडा सर्कल येथे असलेल्या कँनरा बँकेत हा प्रकार सुरू असल्याची माहिती गुन्हे शाखेच्या कक्ष ११चे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील माने यांना मिळाली. त्यानुसार पथकाने अधिक तपास केला. त्यात, कॅनरा बँकमध्ये आधार कार्ड नोंदणीची सेवा पुरविणाऱ्या कंपनीचे अधिकृत सेंटर कार्यरत असून, तेथे ऑपरेटर नेमलेला आहे. तेथे बँकेचे अधिकारी आधार कार्ड नोंदणीसाठी येणाऱ्या व्यक्तीची ओळख, रहिवासी पुराव्याचे मूळ कागदपत्र तपासून पात्र असलेल्या कागदपत्रांवर शिक्का मारून पुढील कार्यवाहीसाठी आधार कार्ड सेंटरच्या ऑपरेटरकडे पाठवतात. त्यानंतर सेंटरमधील ऑपरेटरकड़ून संबंधित व्यक्तीची कागदपत्रे, डोळे स्कॅन करून फोटो घेऊन अर्ज ऑनलाइन अपलोड करण्याची जबाबदारी होती. यासाठी फक्त १०० क्षुल्क आकारण्यात येत आहे.
मात्र संबंधित ऑपरेटर दलालाच्या मदतीने बँकेतील अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून, नातेवाईक म्हणून स्वतःला दाखवत आधार कार्ड बनवून देत असे. दोघांनी मिळून एका नेपाळी नागरिकाला अशा प्रकारे आधार कार्ड बनवून दिले. तसेच अमेरिका रिटर्न असलेल्या भारतीय नागरिकाससुद्धा अशा प्रकारे बतावणी करत आधार कार्ड मिळवून देतो, असे खोटे सांगून त्याची फसवणूक केली. अटक दुकलीला ९ फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली असून, अधिक तपास सुरू आहे.