Join us  

शारीरिक संबंधाला नकार दिल्याच्या रागातून मालाडमध्ये तरुणावर जीवघेणा हल्ला !

By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2017 10:29 AM

शरीर संबंधाला नकार दिल्याच्या रागातून एका सत्तावीस वर्षीय तरुणावर रॉडने हल्ला करण्याचा प्रकार बुधवारी दुपारी मालाड परिसरात घडला.

ठळक मुद्देखाके हे बेरोजगार असून तीन महिन्यांपुर्वी त्यांची मैत्री 'फेसबुक' च्या माध्यमातून सागर सकपाळ नावाच्या तरुणाशी झाली.काही वेळ गप्पा मारल्यानंतर पावणे चारच्या सुमारास सागरने खाके यांना चहा बनविण्यास सांगितला.

गौरी टेंबकर-कलगुटकर

मुंबई - शरीर संबंधाला नकार दिल्याच्या रागातून एका सत्तावीस वर्षीय तरुणावर रॉडने हल्ला करण्याचा प्रकार बुधवारी दुपारी मालाड परिसरात घडला. याप्रकरणी पोलिसांनी एका 24 वर्षीय तरुणाविरोधात गुन्हा दाखल केला असुन तो सध्या फरार आहे. या दोघांची तीन महिने आधी 'फेसबुक' वर मैत्री झाली होती.

शशिकांत खाके हे मालाडच्या सोमवार बाजार परिसरात एकटेच राहतात. तर त्यांचे वडील पालिकेतील सेवेतून निवृत्त झाल्यानंतर पत्नीसह गावी वास्तव्यास असतात. खाके हे बेरोजगार असून तीन महिन्यांपुर्वी त्यांची मैत्री 'फेसबुक' च्या माध्यमातून सागर सकपाळ नावाच्या तरुणाशी झाली. जो मालाड परिसरातच राहतो. त्यामुळे त्याचे खाके यांच्या घरी येणेजाणे होते. 

खाके यांचे नातेवाईक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी चंद्रकांत नामे यांनी 'लोकमत' ला दिलेल्या माहितीनुसार, बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास सागर हा खाके यांच्या घरी आला होता. काही वेळ गप्पा मारल्यानंतर पावणे चारच्या सुमारास सागरने खाके यांना चहा बनविण्यास सांगितला. त्यानुसार खाके स्वयंपाकघरात चहा बनविण्यासाठी गेले. त्यावेळी सागरने खाकेकडे अनैसर्गिक संभोगाची मागणी केली. 

मात्र खाके यांनी नकार दिला. तेव्हा सागरने त्यांच्या सोबत वाद घातला आणि त्यांच्या डोक्यात लोखंडी रॉड मारला. ज्यात त्यांच्या डोक्याला आणि कानाला गंभीर दुखापत झाली. ज्यामुळे ते वेदनेने कण्हत मदतीसाठी ओरडू लागले. तेव्हा सागर घटनास्थळाहून पसार झाला. त्यांचा आवाज ऐकुन शेजाऱ्यांनी त्यांच्या घराकडे धाव घेतली आणि रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या खाके याना रुग्णालयात दाखल केले. 

याची माहिती मालाड पोलिसांना मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मात्र बुधवारी खाके हे काहीच बोलण्याच्या स्थितीत नव्हते. त्यामुळे पोलिसांनी अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल केला. गुरुवारी त्यांनी पोलिसांना दिलेल्या जबाबात सागरने महिनाभरापूर्वी खाके त्यांच्याकडून अनैसर्गिक संभोगाची मागणी केली होती. ज्याला खाके यांनी विरोध केल्याने त्यांच्यासोबत वाद घातला होता. त्यानंतर बुधवारी देखील त्यांनी पुन्हा सागरला विरोध केला. ज्या रागात सागरने खाकेवर हल्ला केल्याचे त्यांनी सांगितले. याप्रकरणी मालाड पोलीस सागरचा शोध घेत आहेत.

आरोपी सागर सकपाळ

 

टॅग्स :गुन्हा