कल्याण - टाटा कंपनीच्या ग्रीडमध्ये बिघाड झाल्याने कल्याणच्या पुढे वीज पुरवठा खंडीत झाला आहे. त्याचा फटका रेल्वे वाहतुकीला बसला आहे. अनेक लोकल गाड्या, एक्सप्रेस खोळंबल्याने मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी ६-७ वाजेदरम्यान टाटा कंपनीच्या ग्रीडमध्ये बिघाड झाला त्यामुळे रेल्वे वाहतुकीचे वेळापत्रक कोलमडलं आहे.
हा बिघाड दुरुस्त व्हायला किती कालावधी लागेल हे अद्याप कळू शकले नाही. परंतु या बिघाडामुळे कर्जत आणि कसारा या दोन्ही दिशेला जाणारी वाहतूक खोळंबली आहे. आज शनिवार असल्याने लोकलला फार गर्दी नसली तरी आज प्रवास करणाऱ्या प्रवाशांना रेल्वेच्या विलंबाने नाहक त्रास सहन करावा लागणार आहे. इलेक्ट्रिक सप्लायरमध्ये झालेल्या बिघाडामुळे कल्याण ते इगतपुरी आणि बदलापूर ते लोणावळा या मार्गावर सर्वच लोकल एकाच जागेवर उभ्या होत्या.
रेल्वे प्रशासनाकडून अर्ध्या तासात हा बिघाड दूर केला तरीही मध्य रेल्वेवरील लोकल सेवा उशिराने सुरू आहेत. विद्युत पुरवठ्याअभावी कसारा, कल्याण या दोन्ही मार्गावरील अप व डाऊन लोकल सेवा बंद पडली होती. त्यामुळे बदलापूर, अंबरनाथ, टिटवाळा या ठिकाणाहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या कर्मचाऱ्यांचा खोळंबा झाला होता.