Join us  

फडणवीसांचे वाक्‌बाण; सत्तापक्षही सरसावला

By ऑनलाइन लोकमत | Published: March 10, 2021 5:41 AM

मनसुख हिरेन यांच्या खुनाचा आणि त्यात पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा हात असल्याचा हिरेन यांच्या पत्नीनेच संशय व्यक्त केल्याचा सीडीआर फडणवीस यांनी सभागृहात सादर करीत जोरदार बॅटिंग केली

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई :  पूर्वी विरोधी पक्षात असतानाचे देवेंद्र फडणवीस यांचे रौद्र रुप मंगळवारी विधानसभेत पुन्हा एकदा दिसले. सचिन वाझेंच्या निलंबन व अटकेच्या मागणीवरून फडणवीस यांनी केलेल्या वाक्‌बाणांनी सरकार घायाळ झाल्याचे चित्र दिसले.  

मनसुख हिरेन यांच्या खुनाचा आणि त्यात पोलीस अधिकारी सचिन वाझेंचा हात असल्याचा हिरेन यांच्या पत्नीनेच संशय व्यक्त केल्याचा सीडीआर फडणवीस यांनी सभागृहात सादर करीत जोरदार बॅटिंग केली. सचिन वाझेला पाठीशी घालणार असाल तर तुमच्यावरच मला शंका येते, कुणाचा असा बचाव करणार असाल तर ते आम्ही  चालू देणार नाही असे त्यांनी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सुनावले. मनसुख यांच्या पत्नीचा सीडीआर फडणवीसांकडे आला कुठून त्याची चौकशी करा. हा अधिकार त्यांना आहे का? असा सवाल काँग्रेसचे ज्येष्ठ सदस्य नाना पटोले यांनी करताच, ‘करा खुशाल माझी चौकशी करा, मला बोलायचा अधिकार आहे, ज्यांनी खून केला त्यांची चौकशी करा. तुम्ही धमक्या दिल्यात ना तरी मी थांबणार नाही. हो मी सीडीआर मिळविला, त्या पलिकडचीही माहिती मी बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही असे त्यांनी बजावले. वाझेंवर तुम्ही कारवाई करत नाही याचा अर्थ पुरावे नष्ट करण्याची मुभा तुम्ही त्यांना देत आहात. वाझे यांच्याबद्दल ख्वाजा युनुसच्या आईने केलेली याचिका दाखल झालेली नाही. त्यामुळे त्यावर चर्चा करता येते. वाझेंवर हिरेन मृत्यूप्रकरणात इतके पुरावे असताना त्यांना वाचविले जात आहे का?, असा सवाल त्यांनी केला. 

कामकाज तहकूब nगदारोळात कामकाज तहकूब होत असताना उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस बैठक झाली. nसंसदीय कामकाज मंत्री अनिल परब बरीच धावपळ करताना दिसले. मात्र, विरोधक वाझेंच्या निलंबनावर ठाम राहिले. कामकाज दिवसभरासाठी तहकूब झाले.

आमदारांकडून विधानसभेतच सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा

मुंबई : विधानसभेचे कामकाज राज्यभरातील लोक लाइव्ह पाहत असताना विधानसभेत सचिन वाझे प्रकरणावरून झालेल्या प्रचंड गदारोळात सोशल डिस्टन्सिंगचा पार फज्जा उडाला. बहुतांश आमदारांनी मास्क घातलेले नव्हते आणि ते घोषणा देत गर्दी करून उभे होते. सत्तारुढ आणि विरोधी पक्ष सदस्यांनीही विधानसभेच्या साक्षीने कोरोना रोखण्यासाठीच्या उपाययोजनांची पायमल्ली केली. 

एक आसन रिकामे ठेवून आमदारांची आसनव्यवस्था सभागृहात करण्यात आली आहे. सभागृहात गर्दी टाळण्यासाठी प्रेक्षक गॅलरीत काही आमदारांच्या बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. मात्र, गॅलरीत बसणाऱ्या दोन्ही बाजूंच्या सदस्यांनी सभागृहात एकच गर्दी केली. दोन्ही बाजूचे सदस्य एकमेकांसमोर येऊन वाद घालत होते.उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी सोशल डिस्टन्सिंग पाळा, आमदार असे वागत असतील तर ते बरोबर नाही अशी तंबी वारंवार दिली पण कुठल्याही सदस्याने त्यांचे म्हणणे ऐकले नाही. 

 

टॅग्स :देवेंद्र फडणवीसनाना पटोले