Join us  

'फडणवीसांनी स्वत:चंच हसू करुन घेतलं', देवेंद्रांवर टीकेचे बाण 

By ऑनलाइन लोकमत | Published: December 31, 2019 8:55 AM

‘विस्तार’ का रखडला आणि विस्तार करणं जमत नाही, या टीकेस काही अर्थ नाही.

मुंबई - महाविकास आघाडी सरकारच्या पहिल्या मंत्रिमंडळ विस्ताराला विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपा नेत्यांनी अनुपस्थिती दर्शवली. भाजपाचा एकही नेता या शपथविधी सोहळ्याला हजर राहिला नाही. त्यावरुन शिवसेनेनं देवेंद्र फडणवीस आणि भाजपावर टीकेचे बाण सोडले आहेत. शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामनाच्या अग्रलेखातून देवेंद्रांना पुन्हा एकदा लक्ष्य करण्यात आलं आहे. 

थातूरमातूर कारणं देऊन मंत्रिमंडळ विस्ताराच्या सोहळ्यावर बहिष्कार टाकून अपशकून करायचा, हे कसले धंदे? सरकारला पुढील किमान सहा महिने राज्य करू द्यावं आणि मग विरोधकांनी आपलं अस्र बाहेर काढावं असं जनतेला वाटत होतं, पण पहिल्या दिवसापासून फडणवीसांनी विरोधासाठी विरोध सुरू करून स्वतःचंच हसं करून घेतलं, असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

‘विस्तार’ का रखडला आणि विस्तार करणं जमत नाही, या टीकेस काही अर्थ नाही. पण, एखाद्या घरात दोनाचे चार होतात, मग पाळणा हलतो आणि संसाराचं सार्थक होतं तसं महाराष्ट्रात झालं. सहा अधिक छत्तीस झाले. त्यामुळे सरकारमधील तीनही पक्षांत आनंदाचं वातावरण दिसत आहे. महाराष्ट्राच्या रखडलेल्या मंत्रिमंडळ विस्ताराला मुहूर्त मिळाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील ‘सहा’जणांचे मंत्रिमंडळ गेले महिनाभर काम करत होतं. या सहाच्या ‘कॅबिनेट’ने नागपूरचे अधिवेशन यशस्वीरीत्या पार पाडलं. राज्यात संपूर्ण सरकार आणि नवे 36 मंत्री अधिकारावर आले आहेत. विरोधी पक्षाने अर्धवटपणा करून राज्याला अपशकून करू नये, असेही शिवसेनेनं अग्रलेखात म्हटले. दरम्यान, ठाकरे सरकारमधील मंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्यानंतर देवेंद्र फडणवीस यांनी अद्याप काहीच प्रतिक्रिया दिली नाही.  

टॅग्स :देवेंद्र फडणवीसशिवसेनाभाजपामंत्री