Join us  

बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका होती श्रीदेवी; जाणून घ्या 10 गोष्टी

By ऑनलाइन लोकमत | Published: February 25, 2018 7:15 AM

बॉलिवूडची चांदनी काळाच्या पडद्याआड....

मुंबईः वयाच्या चौथ्या वर्षी सिनेमाच्या पडद्यावर झळकलेली, सर्वोत्कृष्ट बालकलाकाराचा पुरस्कार मिळवणारी आणि नंतर बॉलिवूडची 'हवाहवाई' म्हणून जगभरात प्रसिद्ध झालेली अभिनेत्री श्रीदेवीच्या अकाली निधनाने सिनसृष्टीवर शोककळा परसली आहे. त्यांचं जाणं सगळ्या चाहत्यांना चटका लावून जाणारंच आहे. पाच वर्षांपूर्वी 'इंग्लिश विंग्लिश'मधून त्यांनी बॉलिवूडमध्ये दमदार पुनरागमन केलं होतं. या चित्रपटानं आणि त्यातील श्रीदेवींनी प्रत्येक स्त्रीच्या कोपऱ्यात घर केलंय. त्यानंतर गेल्या वर्षी 'मॉम' या सिनेमातून श्रीदेवी भेटल्या. सिनेमा हिट झाला नाही, पण श्रीदेवींच्या अभिनयाला सगळ्यांनीच दाद दिली होती. 'बॉलिवूडची पहिली सुपरस्टार नायिका' हे बिरूद अभिमानानं मिरवणाऱ्या श्रीदेवी शेवटपर्यंत स्टार राहिल्या आणि यापुढेही राहणार आहेत. त्यांच्याबद्दलच्या 10 प्रमुख गोष्टी... 

  • श्रीदेवी यांचा जन्म 13 ऑगस्ट 1963 ला तामिळनाडूत झाला होता. त्यांचे वडील वकील होते. श्रीदेवींना एक बहीण आणि दोन सावत्र भाऊ होते.
  • 1996 मध्ये श्रीदेवी यांनी निर्माता-दिग्दर्शक बॉनी कपूर यांच्याही लगीनगाठ बांधली. जान्हवी आणि खुशी या त्यांच्या दोन कन्या. 
  • बॉलिवूडमध्ये पदार्पण करण्याआधी श्रीदेवींनी तमिळ, तेलुगू, मल्याळम आणि कन्नड चित्रपटांमध्ये काम केलं होतं. 
  • श्रीदेवी यांचा पहिला हिंदी चित्रपट 'सोलवां सावन' होता. 1979 मध्ये तो प्रदर्शित झाला होता. पण, 1983 मध्ये 'हिम्मतवाला' हा चित्रपट सुपरहिट ठरला आणि श्रीदेवी स्टार झाल्या. 
  • 1989 मध्ये 'चालबाज' या चित्रपटात श्रीदेवी यांनी डबल रोल साकारला होता. या अभिनयाबद्दल त्यांना पहिल्यांदा सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीच्या फिल्मफेअर पुरस्काराने गौरवण्यात आलं होतं.
  • 1991 मध्ये 'यशराज'च्या 'लम्हे'मध्ये त्यांनी जबरदस्त भूमिका साकारली आणि दुसऱ्या फिल्मफेअरची दुसरी बाहुली पटकावली.
  • 1996 मध्ये बोनी यांच्यासह विवाहबंधनात अडल्यानंतर चित्रपटापासून दूर गेल्या होत्या. त्यावेळी त्यांनी अनेक टीव्ही शोमध्ये काम केलं होतं. 
  • 2012 मध्ये गौरी शिंदे यांच्या इंग्लिश विंग्लिश  या चित्रपटाद्वारे पुनरागमन केलं. 16 वर्ष चित्रपटांपासून दूर राहिल्यानंतरही या चित्रपटामध्ये त्यांच्या अभिनयाचे सर्वच स्तरावरुन कौतुक झालं. 
  • सदमा, नागिन, निगाहें, मिस्टर इंडिया, चालबाज, लम्हे, खुदा गवाह, जुदाई , जाग उठा इंसान,  हिम्मतवाला, सरफरोश, बलिदान, नया कदम, नगीना, घर संसार, मकसद, सुल्तान, आग और शोला, भगवान, आखरी रास्ता, जांबांज, वतन के रखवाले, जवाब हम देंगे, औलाद, नजराना, कर्मा, हिम्मत और मेहनत, मिस्टर इंडिया, निगाहें, जोशीले ,गैर कानूनी, हीर रांझा, चांदनी, रूप की रानी चोरों का राजा, चंद्रमुखी, चांद का टुकड़ा, गुमराह, लाडला, आर्मी, जुदाई, हल्ला बोल, इंग्लिश विंग्लिश आणि मॉम हे श्रीदेवी यांचे काही चित्रपट. 
  • अभिनय क्षेत्रात उत्तम कामगिरी केल्याबद्दल श्रीदेवी यांना भारत सरकारकडून 2013 मध्ये पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले होते.  
टॅग्स :श्रीदेवीबॉलिवूड