Join us

कारखान्यातील कामगार वस्तीत आग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 1, 2019 17:36 IST

सिन्नर-शिर्डी रस्त्यावरील मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील त्रंबक रबर कारखान्यात कामगारांसाठी बांधलेल्या खोल्यांमध्ये इलेक्ट्रीक शॉर्टसर्कीट होऊन आग लागल्याची घटना गुरुवारी रात्री आठ वाजेच्या सुमारास घडली. या आगीमुळे खोल्यांमधील चार घरगुती सिलिंंडरचा स्फोट झाला. या स्फोटात परप्रांतिय कामगारांच्या आठ खोल्या जळून खाक झाल्या. सुदैवाने यात जीवितनाही झाली नसली तरी आठ खोल्यांतील कामगारांचे संसारउपयोगी साहित्य जळून खाक झाल्याने मोठे आर्थिक नुकसान झाले.

मुसळगाव औद्योगिक वसाहतीतील त्रंबक रबर कारखान्याच्या आवारात कामगारांसाठी असलेल्या निवासी खोल्यांमधील एका खोलीत इलेक्ट्रीक शॉर्टसर्कीट झाले. खोल्यांच्या पत्र्यांखाली लावलेल्या थर्माकोलने पेट घेतल्याने क्षणार्थात मोठी आग भडकली. या आगीत त्या खोलीतील गॅस सिलिंडरने पेट घेतल्याने त्याचा स्फोट झाला. त्यात आगीचा भडका उडाल्याने एकामागोमाग एक शेजारील खोल्यांतील आणखी तीन सिलिंंडरचे स्फोट झाले. या भीषण आगी दरम्यान खोल्यांमधील परप्रांतीय कामगारांनी जीव वाचवत सुरक्षीतस्थळी धाव घेतली. आगीची माहिती सिन्नर नगरपालिका आणि माळेगाव औद्योगिक वसाहतीतील अग्निशमन केंद्राला दिल्यानंतर दोन्ही बंब घटनास्थळी दाखल झाले. दोन्ही बंबांच्या सहाय्याने सुमारे एक तासाच्या प्रयत्नांनंतर आग आटोक्यात आली. दरम्यान, आगीवर तातडीने नियंत्रण मिळविल्याने मोठा अनर्थ टळला. आग आटोक्यात आणण्यासाठी एम.आय.डी.सी. अग्नीशमन केंद्राचे सहाय्यक अग्नीशमन अधिकारी पी. के. चौधरी, एन. ए. जाधव, एच.एस. कराड, पी. के. मलगंडे, एन.टी. पादिर, सिन्नर नगरपालिका अग्नीशमन केंद्राचे लाला वाल्मिकी, नारायण मुंडे, जयेश बोरसे, हरीष पाटील आदींनी परिश्रम घेतले.

टॅग्स :आग