सिद्धिविनायकावर अतिरेकी विघ्न?

By Admin | Updated: January 23, 2015 02:29 IST2015-01-23T02:29:05+5:302015-01-23T02:29:05+5:30

पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या चार पथकांनी देशात शिरकाव केला असून २८ जानेवारीआधी देशात मोठया प्रमाणावर घातपात घडविण्याच्या तयारीत आहेत.

Extreme troubles in Siddhiwaina? | सिद्धिविनायकावर अतिरेकी विघ्न?

सिद्धिविनायकावर अतिरेकी विघ्न?

टार्गेट मुंबई : दहशतवाद्यांची चार पथके देशात दाखल, गुप्तचरांचा अ‍ॅलर्ट
मुंबई : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटनांच्या चार पथकांनी देशात शिरकाव केला असून २८ जानेवारीआधी देशात मोठया प्रमाणावर घातपात घडविण्याच्या तयारीत आहेत. यापैकी एक पथक महाराष्ट्रात धडकले असून मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर मुख्य लक्ष्य आहे. मंगळवारी गर्दीच्या वेळी मंदिरावर हल्ला होऊ शकतो, अशी नेमकी माहिती केंद्रीय गुप्तहेर संघटनांकडून मुंबई पोलिसांना प्राप्त झाली आहे.
प्रजासत्ताक दिनाच्या चार दिवस आधी गुप्तहेर संघटनांकडून मिळालेल्या या इनपूटमुळे मुंबई पोलिसांनी शहरात अलर्ट जारी केला आहे. स्थानिक पोलीस ठाण्यातली अ‍ॅन्टी-टेररीस्ट सेल, मुंबई पोलिसांचा गुप्तवार्ता विभाग, गुन्हे शाखा, राज्य दहशतवादविरोधी पथक (एटीएस) या सर्व यंत्रणांना तातडीने खबरदारीच्या उपाययोजना करण्याचे आदेश दिले आहेत. सर्वच यंत्रणांनी खबऱ्यांचे जाळे शहरावर आणि आसपासच्या उपनगरांमध्ये पसरले आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. (प्रतिनिधी)

जमात उद दवा, लष्कर ए तोयबा, जैश ए महोम्मद आणि हिजबुल मुजाहिददीन या चार पाकपुरस्कृत दहशतवादी संघटनांनी आपापली पथके भारतात पाठवली आहेत.

यापैकी पहिले पथक महाराष्ट्रात, दुसरे राजस्थानात, तिसरे उत्तरप्रदेशात आणि चौथे ओडिशात दाखल झाले आहे. या चारही पथकांचा हेतू २८ जानेवारीपूर्वी या चार राज्यांसह देशात अन्यत्र मोठया घातपाती कारवाया घडविण्याचा आहे.

मंगळवारी हल्ल्याची शक्यता
महाराष्ट्रात दाखल झालेल्या पथकाचा प्रमुख अब्दुल्ला कुरेशी नावाचा अतिरेकी आहे. त्याच्यासोबत नझीर अली, जाबेद इक्बाल, नाबीद झेमान आणि शमशेर अशी टोळी आहे. ही टोळी मुंबईतल्या सिद्धिविनायक मंदिरावर हल्ला घडवू शकतात. हा हल्ला प्रामुख्याने मंगळवारी होऊ शकतो, अशी नेमकी माहिती या इनपूटमध्ये देण्यात आली आहे. राज्य पोलीस दलातील सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार आसाम पोलिसांना ही माहिती मिळाली असून ती कच्च्या स्वरूपाची आहे.

१४ सागरी केंद्रांवर जागता पहारा
गुप्तचर यंत्रणांंनी दिलेल्या सतर्कतेच्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्याच्या सागरी किनारपट्टी क्षेत्रातील १४ महत्त्वाच्या केंद्रांवर (कोस्टल पॉइंटस) पोलिसांकडून जागता पहारा ठेवण्यात आला आहे. तटरक्षक दलही डोळ्यात तेल घालून सागरी क्षेत्रावर लक्ष ठेवून आहे. पोलिसांच्या दहा स्पीड बोटीही पूर्ण क्षमतेने कार्यरत असून, सागरी मार्गाने कोणालाही घुसखोरी करता येणार नाही, अशी चोख व्यवस्था ठेवण्यात आल्याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक डॉ. संजय शिंदे यांनी दिली.

Web Title: Extreme troubles in Siddhiwaina?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.