Join us
Daily Top 2Weekly Top 5

अबकारी अनुज्ञप्ती नूतनीकरण शुल्क भरण्यास मुदतवाढ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 19:02 IST

राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवान्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे.

मुंबई : राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या परवान्यांना मुदतवाढ देण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. ३० सप्टेंबर पर्यंत ५० %, तर ३१ डिसेंबर पर्यंत उर्वरित ५० % रक्कम भरण्याची मुभा देण्यात आली आहे. 

राज्य उत्पादन शुल्क विभागामार्फत दरवर्षी मार्च महिन्यात विविध अनुज्ञप्ती यांचे शुल्क वसूल केले जाते. मात्र सध्या राज्यात कोविड-१९ पार्श्वभूमीवर लॉकडाऊन जाहीर करण्यात आल्याने आदरतिथ्य उद्योग (हॉस्पिटॅलिटी इंडस्ट्री ) यास मोठया प्रमाणात आर्थिक झळ बसली आहे.यामुळे राज्य शासनाने अबकारी परवान्यांना  नूतनीकरण शुल्क भरण्यास २४ मार्च च्या निर्णयानुसार तीन टप्पे निश्चित करून दिले. या निर्णयानुसार ३० जून पर्यंत २५ टक्क्यांपर्यंतचा पहिला हप्ता,  ३० सप्टेंबर पर्यंत २५ टक्क्यांपर्यंतचा दुसरा हप्ता,  ३१ डिसेंबर  पर्यंत ५० टक्क्यांपर्यंतचा तिसरा हप्ता भरण्यास मुभा दिली होती. मात्र लॉकडाउन कालावधी लक्षात घेता २६ जून च्या निर्णयान्वये अबकारी परवान्यांना नूतनीकरण शुल्क भरण्यास मुदतवाढ देण्यात आली आहे. तसेच हे शुल्क दोन टप्प्यात भरण्याचा निर्णय देण्यात आला आहे.

कोविड-१९ च्या पार्श्वभूमीवर राज्यात लॉकडाउनचा कालावधी वाढविण्यात आला असताना खाद्यगृह/ बार यांना  व्यवसायाची कोणतीही संधी लॉकडाउन काळात न मिळाल्याने त्यांच्याकडून यासंदर्भात विविध मागण्या / निवेदने  राज्य उत्पादन शुल्क विभागास प्राप्त झाली होती. यासंदर्भात या विभागाचे मंत्री दिलीप वळसे पाटील आणि राज्यमंत्री शंभूराजे देसाई यांनी हा निर्णय घेतला आहे. 

टॅग्स :उत्पादन शुल्क विभागकोरोना वायरस बातम्या