Join us  

कांदा अनुदानास मुदतवाढ - सहकारमंत्री

By ऑनलाइन लोकमत | Published: February 05, 2019 7:18 AM

कांदा अनुदानास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सोमवारी पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली.

मुंबई -  कांदा अनुदानास मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सोमवारी पणनमंत्री सुभाष देशमुख यांनी दिली. कांद्याला मिळणारा बाजारभाव कमी असल्याने अनुदानासाठी ३१ जानेवारी २०१९ पर्यंतची मुदतवाढ ग्राह्य धरण्याबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करण्यात आली असून त्यानुसार निर्णय घेण्यात आल्याचे देशमुख यांनी स्पष्ट केले.राज्यातील दुष्काळी परिस्थिती आणि कांद्याच्या दरातील घसरण या पार्श्वभूमीवर प्रति क्विंटल २०० रुपये दराने प्रति शेतकरी जास्तीत जास्त २०० क्विंटल कांद्यास अनुदान देण्याची घोषणा सरकारने केली होती. या अनुदानासाठी १ नोव्हेंबर ते १५ डिसेंबर २०१८ पर्यंतचा कालावधी ग्राह्य धरण्यात आला होता. मात्र, त्यानंतर कांद्याला दर न मिळाल्याने हा कालावधी आधी ३१ डिसेंबर आणि आता ३१ जानेवारीपर्यंत वाढविण्यात आला आहे.याबाबत देशमुख म्हणाले की, राज्यातील कांद्याच्या दरात झालेल्या घसरणीच्या पार्श्वभूमीवर कृषी उत्पन्न बाजार समित्या, खासगी बाजार समित्यांमध्ये १ नोव्हेंबर २०१८ ते ३१ डिसेंबर २०१८ या कालावधीत कांदा विक्री केलेल्या शेतकऱ्यांना प्रति क्विंटल २०० रुपयेप्रमाणे प्रति शेतकरी कमाल २०० क्विंटल या प्रमाणात अनुदान मंजूर केले होते. ३० डिसेंबर २०१८ नंतरही कांद्याच्या दराची घसरण कायम राहिल्याने अनेक शेतकºयांचे नुकसान झाले. या योजनेपासून कांदा उत्पादक शेतकरी वंचित राहू नयेत, सर्व कांदा उत्पादक शेतकºयांना या योजनेचा फायदा व्हावा यासाठी पुन्हा एक महिन्याची मुदतवाढ देऊन ती ग्राह्य धरण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. याबाबत लवकरच शासन निर्णय प्रसिद्ध करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.योजनेचा कालावधी वाढविला असला तरी या योजनेच्या अंमलबजावणीसाठी अटी व शर्ती या पूर्वीच्या निर्णयाप्रमाणे कायम ठेवण्यात आल्या आहेत. या निर्णयामुळे कांदा उत्पादक शेतकºयांना दिलासा मिळेल, असेही देशमुख यांनी सांगितले.

टॅग्स :कांदा