Join us  

एक्स्प्रेस वे २०२१ अखेर अपघातमुक्त करणार

By ऑनलाइन लोकमत | Published: July 18, 2018 6:08 AM

यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा २०२१ अखेर अपघात व बळीमुक्त करण्याच्या सेव्ह लाईफ फाऊंडेशनच्या (एसएलएफ) योजनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली

मुंबई : यशवंतराव चव्हाण मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे हा २०२१ अखेर अपघात व बळीमुक्त करण्याच्या सेव्ह लाईफ फाऊंडेशनच्या (एसएलएफ) योजनेस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंजुरी दिली असून सर्व संबंधित शासकीय यंत्रणांनी त्यासाठी एसएलएफला सहकार्य करावे, असे आदेश दिले आहेत.एक्स्प्रेस वेला अपघातमुक्तीच्या दिशेने नेण्यासाठी एसएलएफ, राज्य रस्ते विकास महामंडळ संयुक्तपणे आधीपासूनच काम करीत आहेत पण आता मुख्यमंत्र्यांच्या आदेशानंतर संबंधित विविध यंत्रणांना त्यात सामावून घेण्यात येणार आहे. शिवाय महिंद्रा अ‍ॅण्ड महिंद्रा कंपनीच्या सीएसआर फंडाचे बळ त्यास मिळणार आहे. महाराष्ट्र महामार्ग पोलीस, राज्य पोलीस आणि सार्वजनिक आरोग्य विभागाची १०८ अँब्युलन्स सेवा, आयडियल रोड बिल्डर्स आणि सार्वजनिक बांधकाम विभागाचे सहकार्यदेखील मिळेल.एसएलफने एक्स्प्रेस वे वरील अपघात आणि त्यातील मृत्यूंचे प्रमाण कमी करण्यासाठी या आधीच उपाययोजना सुरू केल्या आहेत. २०१७ मध्ये आधीच्या वर्षाच्या तुलनेत अपघातांमधील बळींची संख्या ३० टक्के कमी झाली आहे. एसएलएफ आणि रस्ते विकास महामंडळाने २ हजार १५० अपघातप्रवण जागा एक्स्प्रेस वेवर शोधून काढल्या. ९२२ ठिकाणी अपघात टाळण्यासाठीच्या आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या आणि ४८० ठिकाणी आवश्यक सूचनांचे फलक लावण्यात आले.

टॅग्स :मुंबई-पुणे एक्सप्रेस वे