Join us  

मुंबईतील मोनोरेल स्टेशनजवळील शाळेत सिलेंडरचा स्फोट, सुदैवाने जिवीतहानी नाही

By ऑनलाइन लोकमत | Published: January 15, 2024 10:38 AM

सकाळी ९ वाजताच्या सुमारास लागली आग

Fire in Mumbai School: मुंबई : परळ येथील प्रभाग क्रमांक २०४ मधील साईबाबा म्युनिसिपल स्कूल शाळेची इमारत धोकादायक ठरल्यामुळे गेल्या दीड दोन वर्षांंपासून बंद होती. या शाळेत सिलिंडरचा स्फोट झाल्याची घटना सोमवारी सकाळी घडली. अग्निशमन दलाच्या अधिकाऱ्यांनी वेळीच आग आटोक्यात आणली. शाळा सध्या बंद असल्याने सुदैवाने दुर्घटना टळली. मात्र या दुर्घटनेमुळे शाळेच्या पुनर्बांधणीचा विषय चर्चेत आला आहे. पालिकेकडे सुशोभीकरणाच्या कामासाठी पैसा आणि वेळ आहे. मात्र, शाळेच्या पुनर्बांधणीसाठी पैसे नाहीत का, असा प्रश्न रहिवासी उपस्थित करीत आहेत.

साईबाबा पथ मुंबई पब्लिक स्कूलची इमारत इमारत असल्याने येथे तीन वर्षांपासून शाळा भरत नव्हती. कोविड काळात या शाळेच्या इमारतीचा वापर लसीकरण केंद्रासाठी करण्यात आला होता. सोमवारी सकाळी ६ -७ ऑक्सिजन सिलिंडरचा स्फोट झाल्याने शॉर्ट सर्किट होऊन ही आग लागली, अशी माहिती देण्यात आली. पाच मजली इमारतीला लागून असलेल्या एका हॉलमध्ये आग पसरली. हॉलमध्ये गाद्या होत्या, यामुळे आग पसरली. गाद्यांजवळ सॉकेट्स होते, परिणामी २-३ स्फोट झाले.

मराठी मध्यमवर्गीय वस्तीतील शाळा एक-दीड वर्षापासून बंद ठेवल्यामुळे विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होत आहे. या शाळेच्या दुरुस्तीसाठी आधी पालिका प्रशासनाने नऊ कोटींचे काम दिले होते. दुरुस्तीही सुरू केली होती. मग नंतर अचानक शाळेची इमारत धोकादायक ठरवली. प्रशासन सुशोभीकरण, रस्ते दुरुस्ती, रोषणाई यासाठी करोडो रुपये खर्च करण्यासाठी महापालिकेच्या ठेवी वापरत आहेत. परंतु देशाचे भविष्य असलेल्या विद्यार्थ्यांच्या शाळा बांधण्यासाठी त्यांच्याकडे पैसे नाहीत हे या मुंबईचे दुर्दैव आहे.-अनिल कोकीळ, माजी नगरसेवक

शाळेची दुरुस्ती कधीही सुरू केली नव्हती. मात्र पुनर्बांधणीसाठी निविदा प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.-राजेश कंकाळ, शिक्षणाधिकारी

विद्यार्थ्यांचे स्थलांतर

  • शाळेची इमारत धोकादायक स्थितीत असल्यामुळे ती बंद करण्यात आली होती.
  • या शाळेतील विद्यार्थ्यांना अन्य शाळेत स्थलांतरित करण्यात आले होते. या शाळेत कोरोना केंद्र सुरू केल्यामुळे त्याचे सामान एका खोलीत होते.
टॅग्स :मुंबईआगपरेल आग