सत्तेच्या राजकारणात सेनेचे खच्चीकरण
By Admin | Updated: March 14, 2015 22:12 IST2015-03-14T22:12:38+5:302015-03-14T22:12:38+5:30
अनेक वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासमवेत राहणाऱ्या बहुजन विकास आघाडीने १५ वर्षाचा संसार मोडत राज्यात सत्तापालट झाल्यानंतर भाजपशी सोयरीक केल्याचे स्पष्ट झाले आहे.
सत्तेच्या राजकारणात सेनेचे खच्चीकरण
दीपक मोहिते ल्ल वसई
अनेक वर्षे राष्ट्रवादी आणि काँग्रेस पक्षासमवेत राहणाऱ्या बहुजन विकास आघाडीने १५ वर्षाचा संसार मोडत राज्यात सत्तापालट झाल्यानंतर भाजपशी सोयरीक केल्याचे स्पष्ट झाले आहे. जिल्हापरिषदेच्या ४ विषय समित्यांच्या निवडणुकांमध्ये भाजपनेही नव्या सोयऱ्याकडे आपला हात केला आहे. शुक्रवारच्या या निवडणुकीत भाजपने अचानकरित्या सेनेला धोबीपछाड दिला. गेल्या काही दिवसापासुन भाजप व बहुजन विकास आघाडी जिल्ह्णात एकत्र येण्याच्या तयारीत आहेत. त्यामुळेच वसई विरार शहर महानगरपालिकेच्या आगामी निवडणुकीत हे दोन्ही पक्ष एकत्रितपणे निवडणुक लढले तर आश्चर्य वाटायला नको.
राज्यात सत्तापालट झाल्यानंतर बहुजन विकास आघाडीचे नेते आ. हितेंद्र ठाकूर यांनी आपल्या राजकारणाची दिशा बदलली. भाजपाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमवेत असलेली मैत्री, भाजपशी जवळीक साधणारी ठरली. अनेक कार्यक्रमामध्ये मुख्यमंत्र्यांची आवर्जून उपस्थिती बदलत्या राजकीय समीकरणाची चिन्हे होती. आ. ठाकूरांचे नातेवाईक असलेल्या एका डॉक्टराच्या भिवंडी स्थित चिकित्सा केंद्राच्या उद्घाटनाला मुख्यमंत्र्यांनी आवर्जून लावलेली हजेरी त्यानंतर सतत होणाऱ्या भेटी इ. बाबी लक्षात घेता बहुजन विकास आघाडी व भाजप हे अधिकाधिक जवळ येत असल्याचे स्पष्ट होत आहे. जिल्हापरिषद निवडणुकीमध्ये भाजप-सेना व बहुजन विकास आघाडी अशी क्रमवारी लागताच राजकीय समीकरणे वेगाने बदलली अशी चर्चा सुरू झाली होती. कालच्या जिल्हापरिषदेच्या विषय समित्यांच्या निवडणुकांमध्ये त्यावर शिक्कामोर्तब झाले. भाजपने सेनेला जिल्ह्णातील सत्तेच्या राजकारणातून दुर सारत बहुजन विकास आघाडीला प्राधान्य दिल्याचे स्पष्ट झाले. दोघांच्या या खेळीमुळे सेनेचे जिल्ह्णामध्ये खच्चीकरण करण्याचे प्रयत्न होत असल्याची चर्चा राजकीय वर्तूळात होत आहे. येणाऱ्या वसई विरार महानगरपालिका निवडणुकांमध्ये बहुजन विकास आघाडी, भाजपाला काही जागा सोडतील अशी शक्यता आहे. आ. हितेंद्र ठाकूर यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यासमवेत असलेली घनिष्ट मैत्री पश्चिम किनारपट्टीवरील राजकारणाला कलाटणी देणारी ठरेल.