Join us

नवीन वर्षात समिती अध्यक्षांना महागड्या गाड्या

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 11, 2020 01:07 IST

एकीकडे महसुलात यंदा घट झाल्यामुळे महापालिकेवर आर्थिक संकट घोंघावत आहे.

मुंबई : एकीकडे महसुलात यंदा घट झाल्यामुळे महापालिकेवर आर्थिक संकट घोंघावत आहे. त्याचवेळी उपमहापौर, विरोधी पक्षनेता आणि विविध समित्यांच्या अध्यक्षपदासाठी महागड्या नव्या कोऱ्या गाड्या खरेदी करण्यात येत आहेत. यासाठी तब्बल चार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या प्रस्तावाला गटनेत्यांच्या बैठकीतही हिरवा कंदील दाखवण्यात आला आहे.पालिकेच्या वतीने सर्व समिती अध्यक्ष आणि विरोधी पक्षनेत्यास वाहन आणि चालक उपलब्ध करून देण्यात येतात. सध्या वापरात असलेल्या गाड्या जुन्या झाल्याने वारंवार बंद पडतात. त्यामुळे नवीन गाड्या खरेदी करण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. सध्या समिती अध्यक्षांकडे महिंद्रा स्कार्पिओ ही गाडी आहे. फक्त मुंबईच्या महापौरांसाठी गेल्या वर्षी इनोव्हा क्रिस्टा ही महागडी गाडी खरेदी करण्यात आली आहे. आता अन्य समिती अध्यक्षांना अशीच गाडी हवी आहे.मात्र महापालिकेवर आर्थिक संकट घोंघावत असताना गाड्यांसाठी एवढा खर्च करण्यास विरोधी पक्षांनी आक्षेप घेतला आहे. वाहने खरेदी करण्यापेक्षा भाड्याने घ्यावीत म्हणजे पालिकेची आर्थिक बचत होईल, असे मत विरोधकांनी व्यक्त केले आहे. दरम्यान, या एका वाहनाची किंमत २० लाख रुपये आहे. त्यामुळे २३ वाहनांसाठी महापालिका तब्बल चार कोटी रुपये खर्च करणार आहे. यासाठी प्रशासन लवकरच निविदा मागविणार आहे.