Join us  

अर्णब गोस्वामीकडून महागड्या गिफ्टची लाच; ‘बार्क’च्या माजी सीईओला राेख पैशांसह दिले दागिने

By ऑनलाइन लोकमत | Published: December 30, 2020 12:57 AM

गुन्हे शाखेचा दावा, आर्थिक व्यवहार उघड

मुंबई : टीआरपी घोटाळाप्रकरणी अटकेत असलेले बार्कचे माजी सीईओ पार्थ दासगुप्ता आणि रिपब्लिक टीव्हीचे अर्णब गोस्वामी यांच्यातील आर्थिक व्यवहाराचा लेखाजोखा गुन्हे शाखेने मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयात मांडला. त्यात गोस्वामी यांनी टीआरपी वाढविण्यासाठी दासगुप्ताला रोख पैसे, परदेश सहल, महागड्या वस्तू, दागिने दिल्याचा दावा त्यांनी केला.

टीआरपी घोटाळ्याचा मास्टरमाइंड असलेल्या दासगुप्ताला २४ डिसेंबर रोजी गुन्हेगारी गुप्तवार्ता विभागाने (सीआययू) अटक केली. दासगुप्तानेच टीआरपी वाढविण्यासाठी ब्रॉडकास्ट ऑडियन्स रिसर्च काउन्सिलच्या (बार्क) माजी कर्मचाऱ्यांना हाताशी धरून २०१६ ते २०१९ या कार्यकाळात टीआरपी घोटाळा केल्याचा संशय आहे.गोस्वामींनी दासगुप्ताला २०१७ मध्ये तब्बल ६ हजार डॉलर म्हणजेच जवळपास साडेचार लाख रुपये दिले. लोअर परेलमधील स्टार हॉटेलमध्ये हा व्यवहार झाला. 

दासगुप्ताला सहकुटुंब स्वित्झर्लंड, डेन्मार्कची टूरही स्पॉन्सर केली. त्यानंतर, २०१८ मध्ये रोख २० लाख आणि २०१९ मध्ये दहा लाख रुपये दिले. गोस्वामींनी २०१७ मध्ये रिपब्लिक वाहिनी लाँच केली. तेव्हा टीआरपीत छेडछाडीसाठी त्यांनी दासगुप्ताची मदत घेतली. दासगुप्ता, गोस्वामी एकमेकांना २००४ पासून ओळखतात. या सर्व प्रकारात दासगुप्ताला मदत करणाऱ्या कर्मचाऱ्यांना पैशांसाेबतच महागडी गिफ्ट दिल्याचे गुन्हे शाखेने न्यायालयाला सांगितले.

दासगुप्ताच्या घरात  सापडले ३ किलो सोनेदासगुप्ताच्या घरातून १ लाखाचे घड्याळ, ३ किलो ३०० ग्रॅम सोन्याचे दागिने सापडले. अर्णब यांनी दिलेल्या पैशांतून दासगुप्ताने काय खरेदी केले, व्यवहार कसा झाला, हे सर्व तपासण्यासाठी दासगुप्ताची कोठडी ३० डिसेंबरपर्यंत वाढविली. दासगुप्ताकडून २ मोबाइल, १ आयपॅड, १ लॅपटॉप जप्त केला. 

दासगुप्ता आणि बार्कचा चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) रोमिल रामगढिया यांच्यातील ई-मेल, व्हॉट्सॲप चॅटमधून टीआरपीमध्ये छेडछाड झाल्याचे सिद्ध होत असल्याचे गुन्हे शाखेचे म्हणणे आहे. या चॅटमध्येही दासगुप्ता आणि गोस्वामी यांचा उल्लेख आहे. याबाबत गुन्हे शाखा अधिक तपास करत आहेत.

टॅग्स :अर्णब गोस्वामीपोलिस