‘एमयूटीपी-२’मधील प्रकल्पांचा खर्च वाढला
By Admin | Updated: May 11, 2015 01:02 IST2015-05-11T01:02:05+5:302015-05-11T01:02:12+5:30
प्रकल्पांसाठी वेळेवर न मिळालेला निधी आणि अन्य कारणांमुळे एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) साकारण्यात येणाऱ्या एमयूटीपी-२च्या प्रकल्पांचा खर्च आता परवडेनासा झाला आहे.

‘एमयूटीपी-२’मधील प्रकल्पांचा खर्च वाढला
मुंबई : प्रकल्पांसाठी वेळेवर न मिळालेला निधी आणि अन्य कारणांमुळे एमआरव्हीसीकडून (मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन) साकारण्यात येणाऱ्या एमयूटीपी-२च्या प्रकल्पांचा खर्च आता परवडेनासा झाला आहे. यातील सात प्रकल्पांचा खर्च अनेक कारणांमुळे अवाढव्य वाढला आहे.
मध्य आणि पश्चिम रेल्वेमार्गावर एमआरव्हीसीअंतर्गत एमयूटीपी-२ची कामे सुरू आहेत. या प्रकल्पांची एकूण किंमत सुरुवातीला ५ हजार ३०० कोटी रुपये होती. एमयूटीपी-२ प्रकल्प २००८-०९मध्ये मंजूर करण्यात आला. प्रत्यक्षात प्रकल्पांच्या कामाला २०१०नंतरच सुरुवात करण्यात आली. या प्रकल्पामध्ये राज्य सरकार आणि रेल्वे हे ५०:५० टक्के भागीदार आहेत. त्यामुळे या दोघांकडूनही प्रत्येक वर्षी निधी देण्यात येतो. मात्र आता एमयूटीपी-२मधील प्रकल्पांचा खर्च गगनाला भिडला आहे.
या प्रकल्पांची एकूण किंमत ही ७ हजार ६ कोटी ५३ लाखांपर्यंत गेली आहे. एमयूटीपी-२मधील महत्त्वाच्या प्रकल्पांपैकी सीएसटी-कुर्ला पाचवा व सहावा मार्ग, ठाणे ते दिवा पाचवा-सहावा मार्ग, मुंबई सेंट्रल ते बोरीवली सहावा मार्ग, हार्बरचा गोरेगावपर्यंत विस्तार, नवीन लोकल गाड्यांसाठी निधी, गाड्यांमध्ये सुविधा, नवीन मार्ग अशा काही प्रकल्पांचा खर्च वाढला आहे. (प्रतिनिधी)