आयुक्तांच्या दौऱ्यासाठी प्रवासी वेठीस
By Admin | Updated: December 31, 2014 22:25 IST2014-12-31T22:25:25+5:302014-12-31T22:25:25+5:30
महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यामुळे एनएमएमटी व्यवस्थापनाने मंगळवारी तुर्भे डेपोमध्ये नागरिकांना प्रवेशबंदीचा फतवा काढला होता़

आयुक्तांच्या दौऱ्यासाठी प्रवासी वेठीस
नवी मुंबई : महापालिका आयुक्तांच्या दौऱ्यामुळे एनएमएमटी व्यवस्थापनाने मंगळवारी तुर्भे डेपोमध्ये नागरिकांना प्रवेशबंदीचा फतवा काढला होता़ कामानिमित्त डेपोत येणाऱ्यांना सुरक्षा रक्षकांनी गेटवरूनच हाकलून दिले़ यामुळे नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे़
नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाविषयी प्रवाशांच्या तक्रारी वाढू लागल्या आहेत़ उपक्रमाचा तोटाही दिवसेंदिवस वाढत आहे़ यामुळे महापालिका आयुक्त आबासाहेब जऱ्हाड यांनी उपक्रमाचा आढावा घेण्यासाठी मंगळवारी तुर्भे डेपोला भेट देण्याचा निर्णय घेतला होता़
आयुक्त येणार असल्यामुळे दिवसभर नागरिकांना डेपोत प्रवेशबंदी करण्यात आली होती़ उपक्रमाविषयी असलेली तक्रार किंवा इतर कामासाठी नागरिक या ठिकाणी येतात़ या सर्वांना सुरक्षा रक्षकांनी गेटवरूनच परत पाठविले़ आयुक्तसाहेब डेपोत आले आहेत़ त्यांचा पाहणी दौरा संपेपर्यंत कोणालाही आतमध्ये न सोडण्याचे आदेश असल्याचे सांगितले जात होते़ विनंती करूनही आतमध्ये सोडले जात नव्हते़ एनएमएमटीच्या मनमानीविषयी नागरिकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे.
आयुक्तांनी कामकाजाचा आढावा घेवून तोटा भरून काढण्यासाठी प्रयत्न करण्याच्या सूचना दिल्या़ अनेक मार्गांवरील बसेस तोट्यात आहेत़ असे मार्ग बंद करण्यात यावेत़ आयआयटी पवईसारख्या संस्थेकडून बसमार्गांचे सर्वेक्षण करून घ्यावे अशा सूचना देण्यात आल्या आहेत़
फुकट्या प्रवाशांवर कारवाई करण्याच्या सूचनाही दिल्या आहेत़ आयुक्तांच्या दौऱ्यानंतरतरी येथील सोयी सुविधांमध्ये सुधारणा होईल, अशी इच्छा प्रवाशांकडून वर्तवण्यात येत आहे. (प्रतिनिधी)
च्पालिका आयुक्त डेपोमध्ये येणार असल्यामुळे दोन दिवसांपासून पूर्ण डेपो चकाचक करण्याचे काम सुरू केले होते़ कुठेही कचरा दिसणार नाही याची काळजी घ्या अशा सूचना कर्मचाऱ्यांना देण्यात आल्या होत्या़
च्कार्यालयामध्ये कुठेही अस्ताव्यस्तपणा दिसता कामा नये यासाठी विशेष लक्ष देण्यात येत होते़ आयुक्तांसमोर कोणी तक्रारी करू नये यासाठी डेपोत दिवसभर कोणालाही येवू दिले जात नव्हते़
सर्व गेटमधून कर्मचाऱ्यांना मोकळीक : एनएमएमटी डेपोमध्ये नागरिकांना रेल्वे स्टेशनकडील प्रवेशद्वाराने यावे लागते़ परंतु कर्मचाऱ्यांना मागील दरवाजानेही प्रवेश दिला जातो.विशेष म्हणजे या दरवाजामधून आतमध्ये येणाऱ्यांची व बाहेर जाणाऱ्यांची नोंदच ठेवली जात नाही़ चोरी झालीच तर जबाबदार कोण असा प्रश्न आहे.