लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : पुण्याच्या कल्याणीनगरातील एकाच कुटुंबातील चार जणांच्या हत्या प्रकरणातील मुख्य आरोपीला सत्र न्यायालयाने ठोठावलेली फाशीची शिक्षा उच्च न्यायालयाने रद्द करून त्याला तातडीने मुक्त करण्याचे आदेश सरकारला दिले.
पुणे सत्र न्यायालयाने २०२१ मध्ये भगवत बाजीराव काळे या आरोपीला चौघांच्या हत्येप्रकरणी दोषी ठरवून फाशीची शिक्षा ठोठावली होती. उच्च न्यायालयाच्या न्या. भारती डांग्रे आणि न्या. मंजूषा देशपांडे यांच्या खंडपीठाने त्याला दोषी ठरविण्याचा आणि फाशी ठोठावण्याचा सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला.
काळेला ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी राज्य सरकारने केलेले अपील फेटाळताना खंडपीठाने, ‘फाशीची शिक्षा निश्चित करण्यासारखे हे प्रकरण नाही’, अशी टिप्पणी केली.
पुण्यातले प्रकरण...सरकारी वकिलांच्या म्हणण्यानुसार, १५ मे १९९७ रोजी रमेश पाटील (५५) विजया पाटील (४७) पूजा पाटील (१३) आणि मंजूनाथ पाटील (१०) यांची त्यांच्या राहत्या घरात हत्या करण्यात आली होती. कर्नाटकातील हुबळी येथून पुण्यातील कल्याणीनगर येथे राहायला आलेल्या पाटील यांच्या घरी काळेची पत्नी गीता घरकाम करत होती. काळे, त्याची पत्नी गीता आणि त्यांचा एक नातेवाईक साहेबराव या तिघांनी मिळून चौघांची हत्या केली. घरातील चांदीचे दागिने आणि रोकड असा ४९ लाख रुपयांचा ऐवज तिघांनी पळवला. तिघांनाही सप्टेंबर १९९७ मध्ये अटक करण्यात आली होती. काळे आणि साहेबराव यांना न्यायालयात नेत असताना दोघेही फरार झाले. पोलिसांनी साहेबरावला २००१ मध्ये अटक केली होती.