Join us
Daily Top 2Weekly Top 5

संतापजनक! काेट्यवधींच्या ग्रंथसंपदेचा विद्यापीठात कचरा  

By सीमा महांगडे | Updated: February 23, 2022 11:02 IST

ग्रंथालयाची नवी इमारतही ५ वर्षांपासून धूळ खात पडून, जुन्या इमारतीत हजारो पुस्तके फाटली, वाळवीही लागली 

सीमा महांगडेमुंबई : ग्रंथालयाची इमारत म्हणायला नवी कोरी आहे; पण तीही पाच वर्षांपासून धूळ खात पडून आहे. वाचक आहेत; पण पुस्तकांची पुरती वाट लागली आहे. करोडोंची ग्रंथसंपदा वाळवी लागल्याने पोत्यात भरली जात आहे. रद्दीत काढली जात आहे. अत्यंत संतापजनक असा हा प्रकार शेकडो वर्षांची परंपरा असणाऱ्या, जगात नावलौकिक मिळालेल्या मुंबई विद्यापीठाच्या जवाहरलाल नेहरू ग्रंथालयाच्या बाबतीत घडला आहे.

५ वर्षांपासून ग्रीन टेक्नॉलॉजीवर आधारित आणि सर्व सोयी-सुविधांनी सज्ज अशी ग्रंथालय इमारत असताना केवळ वापराचे प्रमाणपत्र नाही म्हणून स्थलांतरणाचे काम रखडले आहे. ते प्रमाणपत्र मिळवण्याची इच्छाशक्तीच विद्यापीठ प्रशासन गमावून बसले आहे. 

अनेक पुस्तके जीर्ण आणि कालबाह्य झालेली आहेत. ती वेगळी करून काढून टाकण्याची प्रक्रिया सुरू असल्याचा दावा विद्यापीठाने केला आहे. अनेक देणगीदारांनी त्यांच्याकडे जागा नसल्याने विद्यापीठाला देणगी म्हणून पुस्तके दिल्याचे म्हटले आहे. ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांना पुस्तकांची मांडणी, जतन करणे, निगा राखण्याऐवजी, वाळवी लागेपर्यंत दुर्लक्ष करण्याचे प्रशिक्षण विद्यापीठाकडून देण्यात आले आहे का? असा संतप्त प्रश्न सिनेट सदस्य वैभव थोरात यांनी केला आहे. 

भारतरत्न पांडुरंग काणे यांनी दिलेली पुस्तकेही फाटलीयांच्या कुटुंबियांनी दिलेली त्यांची ५,००० हजार पुस्तके जागा नाही म्हणून दिली का? आता ती पुस्तके फाटली. त्यांना वाळवी लागली. त्याच्याकडे अक्षम्य दुर्लक्ष हा त्यांचा अपमान नाही का? असा प्रश्न ॲड. वैभव थोरात यांनी केला आहे. 

९० लाख रुपयांची यंत्रणा चालवण्यासाठी माणूस नाहीकाळानुरूप ग्रंथालय डिजिटल करण्याच्या उद्देशाने विद्यापीठाने सुमारे ९० लाख रुपये खर्च करून स्वयंचलित स्कॅनर विकत घेतला होता. हा स्कॅनर चालवण्यासाठीचे कुशल मनुष्यबळ विद्यापीठाकडे नाही म्हणून हा स्कॅनर विनावापर पडून असल्याचेही थोरात यांनी कुलगुरूंच्या निदर्शनास आणून दिले आहे. या स्कॅनरद्वारे एका तासात एक पुस्तक स्कॅन होऊ शकते. मात्र, अद्याप त्याला सुरू करण्यासाठीच मुहूर्त मिळालेला नाही. 

स्थापना

  • राजाबाई टॉवर ग्रंथालय : फेब्रुवारी १८८० 
  • जवाहरलाल नेहरू ग्रंथालय : १८ ऑक्टोबर १९७६ 
  • एकूण ग्रंथसंपदा : ७ लाख ९२ हजार ०१८ 
  • संदर्भ पुस्तके : ११,६६८ 
  • भारतीय जर्नल्स : १७२ 
  • परदेशी जर्नल्स : ४१५ 
  • पुरातन कालखंड जर्नल्स : ७७,२९२
  • सीडी/ व्हीसीडी : २२५७ 
  • डेटाबेस : ३० 
  • ऑनलाइन जर्नल्स : १० हजारांहून अधिक
  • हस्तलिखिते : ९,९०० 
  • अरेबियन हस्तलिखिते : १,१९० 
  • पर्शियन व उर्दू भाषांतील हस्तलिखिते : ७,५००
टॅग्स :मुंबई विद्यापीठ