मंत्रालयातील बदली ही शिक्षा की बक्षिसी?; काँग्रेसचा सवाल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 5, 2019 06:16 IST2019-06-05T01:45:03+5:302019-06-05T06:16:24+5:30
या संपूर्ण प्रकरणाचा निषेध करीत टोकस म्हणाल्या, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधीजींचे योगदान मोठे आहे. जगभर त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा ठसा उमटला आहे.

मंत्रालयातील बदली ही शिक्षा की बक्षिसी?; काँग्रेसचा सवाल
मुंबई : निधी चौधरी यांनी महात्मा गांधी यांच्याबाबत केलेल्या विधानामागे भाजप आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची विचारधाराच आहे. त्यामुळेच अशा संतापजनक विधानानंतर त्यांची मुंबई महापालिकेतून थेट मंत्रालयात बदली करण्यात आली. त्यांच्या बदलीला सरकारने केलेली कारवाई म्हणावे की बक्षिसी म्हणावे, असा प्रश्न पडल्याचा आरोप प्रदेश महिला काँग्रेसच्या अध्यक्षा चारुलता टोकस यांनी केला आहे.
या संपूर्ण प्रकरणाचा निषेध करीत टोकस म्हणाल्या, भारताला स्वातंत्र्य मिळवून देण्यात महात्मा गांधीजींचे योगदान मोठे आहे. जगभर त्यांच्या कार्याचा आणि विचारांचा ठसा उमटला आहे.
अशा या महान व्यक्तीबद्दल वाटेल तशी विधाने करून त्यांचा अपमान करण्याचा सातत्याने प्रयत्न होत आहे. याचा बोलविता धनी कोण आहे, याचा शोध घ्यायला हवा. अशा घटना वारंवार घडत असतील तर महिला काँग्रेस रस्त्यावर उतरून आंदोलनाची भूमिका घेईल.
सनदी अधिकारी असणाऱ्या चौधरी यांनी ‘चलनावरून महात्मा गांधीजींचे छायाचित्र हटवणे, जगभरातील त्यांचे पुतळे उखडून टाकणे, रस्ते व वेगवेगळ्या संस्थांना दिलेली नावे बदलावी व शेवटी ३० जानेवारी १९४८ बद्दल गोडसेचे आभार,’ असे ट्विट केल्यामुळे संपूर्ण देशात संतापाची लाट उसळल्याचेही टोकस म्हणाल्या.