विद्यापीठाचे परीक्षा भवन दोन तास अंधारात
By Admin | Updated: May 17, 2015 00:35 IST2015-05-17T00:35:07+5:302015-05-17T00:35:07+5:30
मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील परीक्षा भवन शनिवारी दुपारी दोन तास अंधारात बुडाले.

विद्यापीठाचे परीक्षा भवन दोन तास अंधारात
मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या कलिना कॅम्पसमधील परीक्षा भवन शनिवारी दुपारी दोन तास अंधारात बुडाले. सकाळपासूनच विद्यापीठातील वीजपुरवठा खंडित झाल्याने कलिना कॅम्पसमधील कामकाजावर परिणाम झाला. परीक्षा भवनात पेपर तपासण्याचे काम सुरू असतानाच वीज गेल्याने पेपर तपासणीचे काम पूर्णपणे बंद पडले होते.
कलिना कॅम्पसमध्ये सकाळी साडेअकरा वाजेपासून वीजपुरवठा विस्कळीत झाला. त्यामुळे विविध विभागांमध्ये संशोधनाचे काम करणाऱ्या विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागला. दुपारी तीन वाजण्याच्या सुमारास परीक्षा भवनाचा वीजपुरवठा खंडित झाला. परीक्षेनंतर येथे विविध अभ्यासक्रमांचे पेपर तपासणीचे काम सुरू आहे. अचानक वीज गेल्याने पेपर तपासण्यासाठी आलेल्या मॉडरेटरर्सना थांबून राहावे लागले. तर परीक्षा भवनातील इतर कामेही ठप्प झाली होती, असे सिनेट सदस्य संजय वैराळ यांनी सांगितले. विद्यापीठाकडे पूर्ण वेळ वायरमन नाही. रोजंदारीवर असलेल्या व्यक्तीकडून वायरमनची कामे करण्यात येत आहेत. त्यामुळे विद्यापीठात दुर्घटना होण्याची भिती असून, व्यवस्थापनाने स्वतंत्र खाते निर्माण करावे, अशी मागणी वैराळ यांनी केली आहे.