कर्जतमध्ये ईव्हीएम मशिन्सची तपासणी
By Admin | Updated: October 10, 2014 23:05 IST2014-10-10T23:05:32+5:302014-10-10T23:05:32+5:30
कर्जत विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणा-या अंतिम उमेदवारांची यादी असलेल्या मतदान पेट्यांचे (ईव्हीएम) सिलिंग गुरुवारी करण्यात आले

कर्जतमध्ये ईव्हीएम मशिन्सची तपासणी
कर्जत : कर्जत विधानसभा मतदारसंघातील निवडणूक लढविणाऱ्या अंतिम उमेदवारांची यादी असलेल्या मतदान पेट्यांचे ( ईव्हीएम) सिलिंग गुरुवारी करण्यात आले. कर्जत आणि पनवेल विधानसभा मतदारसंघातील निवडणूक आयोगाचे निरीक्षक बिपीन चंद्र झा यांनी या सिलिंग प्रक्रि येची पाहणी केली तसेच कर्मचाऱ्यांनाही मार्गदर्शन केले.
कर्जत मतदार संघासाठी आणण्यात आलेल्या ईव्हीएम मशिन कर्जत येथील कोकण ज्ञानपीठ कॉलेज येथे ठेवण्यात आल्या आहेत. निवडणूक लढविणारे उमेदवार यांच्या नावाची तयार करण्यात आलेली मतपत्रिका ईव्हीएम मशीनमध्ये टाकण्याचे काम आज उमेदवार आणि त्यांचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत करण्यात आले. सुरुवातीला कर्जत मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी राजेंद्र बोरकर यांनी सर्व कर्मचारी वर्गाला मार्गदर्शन करून प्रक्रिया बिनचूक होण्यासाठी सहकार्य करण्याचे आवाहन केले. त्यावेळी सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी रवींद्र बाविस्कर आणि दीपक आकडे हे देखील उपस्थित होते. यावेळी ईव्हीएम मशिनचे निवडणूक आयोगाने नेमलेले अभियंता डी.बी. पाटील यांनी सर्व कर्मचारीवर्गाला सिलिंगबाबत माहिती दिली.
कर्जत मतदारसंघात एकूण ३१० मतदान केंद्रे आहेत. त्यासाठी ३१० ईव्हीएम मशिन यांचे सिलिंग करण्यात आले, तर मशिनमध्ये कोणती अडचण निर्माण झाल्यास तातडीची गरज म्हणून ३९ अधिकच्या ईव्हीएम मशिन यांचे सिलिंग करण्यात आले. यावेळी निवडणूक आयोगाने नेमलेले निरीक्षक बिपीन चंद्र झा यांनी सिलिंग प्रक्रि येची व खोलीची पाहणी केली .