Join us
Daily Top 2Weekly Top 5

मुंबईचं महापौरपद शोभेचं, प्रशासकीय अधिकार काडीचा नाही; किशोरी पेडणेकरांचा घणाघात

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 24, 2023 13:04 IST

आपत्कालीन परिस्थितीत जे आवश्यक आहे. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जे लागेल ते घ्या. आम्ही प्रत्येक नियमांचे पालन केले आहे असं किशोरी पेडणेकर म्हणाल्या.

मुंबई - मी ईडीच्या रडारवर नाही तर मला रडारवर आणलं गेलंय. मी काहीच केले नाही तर ईडीला घाबरू कशाला असा सवाल मुंबईच्या माजी महापौर आणि ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी विचारला आहे. सध्या कोविड घोटाळ्याशी संबंधित ईडीचा तपास सुरू आहे. त्यात बीएमसी अधिकाऱ्यांसह ठाकरे गटाचे पदाधिकाऱ्यांची घरी ईडीची छापेमारी सुरू आहे. या घोटाळ्यात किशोरी पेडणेकरही अडचणीत येतील अशी चर्चा सुरू होती. त्यावर पेडणेकरांनी स्पष्टीकरण दिले आहे. 

किशोरी पेडणेकर म्हणाल्या की, आपत्कालीन परिस्थितीत जे आवश्यक आहे. लोकांचे प्राण वाचवण्यासाठी जे लागेल ते घ्या. आम्ही प्रत्येक नियमांचे पालन केले आहे. कोटेशन काढले, टेंडर कोटेशन काढले. त्याचा बीएमसीत वेगळा विभाग आहे. त्याचा नगरसेवक महापौरांशी संबंध काय? स्थायी समितीत सगळे प्रस्ताव येतात. त्यात सर्वपक्षीय नगरसेवक असतात. मग त्यात विरोध का झाला नाही. त्रास प्रचंड आहे. आपल्याकडे तोफगोळा, सैनिक आहेत. पर्याय उभे करू असं पेडणेकरांनी म्हटलं. 

तसेच मी बैठकीला येणार नाही असं पत्रकारांनी म्हटलं, मी येणार नाही असं पत्रकारांना पत्र पाठवले होते का? कुठूनही बातम्या पेरायच्या. फालतुगिरी बंद करा. कडवट शिवसैनिकांना टार्गेट करायचे. सत्यता पडताळा. आम्हाला प्रशासकीय अधिकार काडीचा नाही. महापौरपद हे शोभेचे आहे असं प्रशासनाच्या अनेकांनी सांगितले. बसायचं, वाहन घेऊन फिरायचं हेच काम आहे. कोविड काळात बाळासाहेबांनी शिकवण दिली. मरणाला घाबरायचे नाही प्रत्येक गोष्टीला सामोरे जायचं. मला महापौरपदाची संधी दिली असं किशोरी पेडणेकरांनी म्हटलं. 

दरम्यान, कोविड काळात घराबाहेर पडण्याची परिस्थिती नव्हती. माणसाने माणसाला भेटण्याची स्थिती नव्हती. हे मुंबई, महाराष्ट्रातच नाही देशात आणि जगात घडत होते. उद्धव ठाकरेंनी संपूर्ण देशात पहिला लॉकडाऊन महाराष्ट्रात केला. कोविड सेंटर उभारले. कोविड सेंटर १४-१५ दिवसांत उभे करण्याचे कौशल्य महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी आदि्त्य ठाकरेंच्या मार्गदर्शनात उभे केले असंही किशोरी पेडणेकर यांनी सांगितले. 

टॅग्स :किशोरी पेडणेकरमुंबई महानगरपालिका