माजी नगरसेवक टॅबच्या मोहात
By Admin | Updated: May 15, 2015 00:37 IST2015-05-15T00:37:59+5:302015-05-15T00:37:59+5:30
पेपरलेस कामकाज करण्यासाठी महापालिकेने नगरसेवकांना टॅब दिले होते. वास्तविक त्याचा प्रत्यक्षात कामासाठी काहीही उपयोग झाला नाही. कार्यकाळ संपला तरी

माजी नगरसेवक टॅबच्या मोहात
नामदेव मोरे, नवी मुंबई
पेपरलेस कामकाज करण्यासाठी महापालिकेने नगरसेवकांना टॅब दिले होते. वास्तविक त्याचा प्रत्यक्षात कामासाठी काहीही उपयोग झाला नाही. कार्यकाळ संपला तरी
अद्याप कोणीही टॅब परत केलेले नाहीत. यामुळे महापालिकेचे जवळपास ३७ लाख ६० हजार रुपयांचे नुकसान होण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
नवी मुंबई महानगरपालिकेने २०१४ - १५ च्या अर्थसंकल्पामध्ये नगरसेवकांना टॅब पुरविण्यासाठी तरतूद केली होती. महापालिकेचे कामकाज पेपरलेस करण्यासाठी ही तरतूद होती. महापालिकेची सर्वसाधारण सभा, स्थायी समिती, विषय समित्यांची विषयपत्रिका थेट आॅनलाइन उपलब्ध करून देण्याची योजना होती. परंतु प्रत्यक्षात कार्यकाळ संपत आल्यानंतर टॅबचे वाटप करण्यात आले. ८९ नगरसेवकांसाठी जवळपास ३७ लाख ६० हजार रुपये खर्च करून टॅब खरेदी केले होते. अनेक नगरसेवकांना त्याचा वापर कसा करायचा हेच माहिती नव्हते. यामुळे महापालिके व्यतिरिक्त इतर कामांसाठीच त्याचा वापर करण्यात आला. अनेक वेळा सर्वसाधारण सभा सुरू असताना नगरसेवक टॅबवर फोटो पाहत बसलेले दिसत. नगरसेवकांचा कार्यकाळ संपल्यानंतर टॅब परत जमा करणे आवश्यक होते. महापालिका आयुक्त प्रकाश वाघमारे यांनीही ते परत घेतले जाणार असल्याचे स्पष्ट केले होते. परंतु निवडणुका संपल्यातरी अद्याप कोणीही टॅब जमा केलेले नाहीत. नगरसेवकांना टॅबचा मोह सुटला नसल्यामुळे महापालिका वर्तुळात नाराजी व्यक्त केली जात आहे.
नगरसेवकांना वितरित केलेल्या टॅबचा कामकाज सुधारण्यासाठी काहीही उपयोग झालेला नाही. शेवटपर्यंत विषयपत्रिका नगरसेवकांच्या घरी किंवा कार्यालयात पोहचवाव्या लागत होत्या.
पेपरलेस कामकाजाचा उद्देश साध्य झालाच नाही. परंतु कार्यकाळ संपल्यानंतरही टॅब परत न आल्यामुळे नवीन नगरसेवकांना टॅब कोठून द्यायचे, असा प्रश्न निर्माण झाला आहे. महापालिका आयुक्त टॅब परत करण्यासाठी संबंधितांकडे पाठपुरावा करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. टॅब परत आले नाहीत तर पालिकेचे लाखो रुपयांचे नुकसान होणार आहे.