Join us  

सर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल, युती तुटणार नाही; शिवसेनेचा भाजपावर विश्वास 

By ऑनलाइन लोकमत | Published: June 21, 2019 9:01 AM

उद्याच्या विधानसभेत युतीला दिल्लीप्रमाणे मोठे बहुमत मिळावे यासाठीच एकदिलाने काम केले पाहिजे. युतीची वज्रमूठ अभेद्य आहे

मुंबई - मुख्यमंत्री शिवसेनेच्या मंचावर आले व उरलीसुरली किल्मिषे त्यांनी दूर केली. ते शिवसेनेसाठी अतिथी नव्हते तर आमच्यातलेच एक होते. फडणवीसांनी सांगितले, ‘त्यांना सत्ता खुर्ची आणि पदासाठी नको आहे.’ आम्हीही तेच सांगत आहोत. इतरही अनेक विषय आहेत. त्यावर नंतर पाहू. बाकी मुख्यमंत्र्यांनी सांगितले आहेच, ‘‘सर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल!’’ त्यामुळे आता स्पष्टच सांगायचे तर शिवसेना-भाजप युतीच्या विरोधकांनी पाण्यात घातलेले देव बाहेर काढावेत हेच बरे! एकतर ही युती आता तुटणार नाही, मतभेदांच्या खडकावर आपटून फुटणार नाही असा विश्वास सामना संपादकीयमधून व्यक्त करण्यात आला आहे. 

मुख्यमंत्रिपदावरुन शिवसेना-भाजपामध्ये कुरघोडीचा प्रयत्न सुरु असताना त्यावर शिवसेनेकडून फुंकर घालण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. उद्याच्या विधानसभेत युतीला दिल्लीप्रमाणे मोठे बहुमत मिळावे यासाठीच एकदिलाने काम केले पाहिजे. युतीची वज्रमूठ अभेद्य आहे असं शिवसेनेने स्पष्ट केलं आहे. 

सामना संपादकीयमधील महत्वाचे मुद्दे 

  • 53 व्या वर्धापन दिनासाठी प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहिलेल्या मुख्यमंत्री फडणवीसांचे त्याच दिलदारीने स्वागत केले गेले. ‘‘शिवसैनिकांकडून ऊर्जा घेण्यासाठी मी येथे आलो आहे,’’ असे मुख्यमंत्री सहज बोलून गेले, पण समोरची उसळती ऊर्जा पाहून तेही त्या जल्लोषाचा एक भाग बनले. 
  • शिवसेनेच्या ‘शुद्ध’ व्यासपीठावर मुख्यमंत्र्यांना पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या असतील. कदाचित बुबुळेही खोबणीतून बाहेर पडली असतील. . महाराष्ट्राचे भवितव्य आणि नशिबाची गाठ युतीबरोबर बांधली गेली आहे. 
  • शिवसेनेच्या व्यासपीठावर मुख्यमंत्री कसे? यावर अनेकांना जे खाजवायचे ते खाजवत बसू द्या. डोकी नसल्याने ते खाजवण्याचा प्रश्नच येत नाही. अतिथींना बोलवून त्यांचे विचार ऐकणे ही परंपरा शिवसेनेची आहेच. 
  • शिवसेनेचे घोर विरोधक असलेले कॉम्रेड श्रीपाद अमृत डांगे यांना पहिल्या राष्ट्रीय अधिवेशनात खास अतिथी म्हणून निमंत्रित केलेच गेले नसते. वेळोवेळी असे अनेक जण शिवसेनेच्या व्यासपीठावर आलेच आहेत. अगदी जॉर्ज फर्नांडिस आणि शरद पवारांनीही शिवतीर्थावर हजेरी लावली आहे. 
  • मुख्यमंत्री बिनधास्तपणे म्हणाले, ‘‘आमच्यात मुख्यमंत्रीपदावरून वाद नाहीत. सर्वकाही ठरल्याप्रमाणे होईल.’’ हे मुख्यमंत्र्यांचे विधान लाखमोलाचे आहे. युतीत मुख्यमंत्रीपदाचे काय? यावर चघळत बसणाऱया मीडियाला मुख्यमंत्र्यांनी दिलेले हे उत्तर आहे. जे ठरले तेच होईल हा युतीतील समन्वयाचा मंत्र आहे. 
  • युती म्हटली की सर्व समसमान होईल, असे आम्ही सांगताच मुख्यमंत्र्यांनी दिलखुलास दाद दिली. थोडक्यात काय, मुख्यमंत्री शिवसेनेच्या मंचावर आले व उरलीसुरली किल्मिषे त्यांनी दूर केली. ते शिवसेनेसाठी अतिथी नव्हते तर आमच्यातलेच एक होते.  
टॅग्स :शिवसेनाभाजपा