"शोषित, पीडित आणि दिव्यांगांना जगण्याचे बळ देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे"

By मनोहर कुंभेजकर | Published: May 9, 2023 07:32 PM2023-05-09T19:32:28+5:302023-05-09T19:33:13+5:30

केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे प्रतिपादन

Everyone needs to take the initiative to give strength to the oppressed, victims and disabled to live says Union Minister Nitin Gadkari | "शोषित, पीडित आणि दिव्यांगांना जगण्याचे बळ देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे"

"शोषित, पीडित आणि दिव्यांगांना जगण्याचे बळ देण्यासाठी सर्वांनी पुढाकार घेणे गरजेचे"

googlenewsNext

मनोहर कुंभेजकर, लोकमत न्यूज नेटवर्क, मुंबई: सूर्योदय फाऊंडेशनने त्यांच्या सामाजिक कार्याअंतर्गत 'द गिफ्ट ऑफ साउंड' नावाचा उपक्रम सुरू केलेला आहे ज्यामध्ये ते मुंबई व देशातील महानगर पालिका शाळेतील मुलांच्या श्रवण क्षमतेची चाचणी घेतली जात आहे. या उपक्रमाचा शुभारंभ आज वांद्रे पश्चिम रंगशारदा येथे केंद्रीय रस्ते,वाहतूक,नाहमार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते करण्यात आला. "गिफ्ट ऑफ साऊंड" या उपक्रमाअंतर्गत सूर्योदय फाउंडेशनतर्फे मुंबईतील महानगरपालिका शाळांमधील 120 मुलांना त्यांच्या  हस्ते मोफत श्रवणयंत्रांचे वाटप करण्यात आले. या प्रसंगी सुप्रसिद्ध गायिका व सूर्योदय फाऊंडेशनच्या संस्थापिका पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल, भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते सुनील देवधर, डब्ल्यूएसएचे चेयरमन अविनाश पवार आणि परिसर अशा या सामाजिक संस्थेच्या अध्यक्षा आरती सावूर उपस्थित होत्या.

या प्रसंगी बोलताना नितीन गडकरी म्हणाले की, आपल्या महाराष्ट्राला साहित्याची देणं आहे. संत तुकारामांनी आपल्या अभंगात सांगितले आहे की "जे का रंजले गांजले, त्यासी म्हणे  जो आपुले, तोचि साधू ओळखावा, देव तेथेचि जाणावा" या अभंगाची प्रचिती आपल्याला पद्मश्री डॉ. अनुराधा पौडवाल यांच्या पुढाकाराने सूर्योदय फाऊंडेशन तर्फे सुरु करण्यात आलेल्या या उपक्रमातून येते. बदललेल्या तंत्रज्ञानाच्या माध्यमातून आपण गरजवंतांची व शोषितांची तसेच दिव्यांगंची सेवा करू शकतो, त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणून जगण्याचे बळ देऊ शकतो, फक्त त्यासाठी पुढाकार घेणे गरजेचे आहे. आपले सामाजिक दायित्व ओळखून त्यांनी हा उपक्रम सुरु केला आहे. 

समाजातील शोषितांच्या भावना व संवेदनशीलता लक्षात घेऊन काम करण्याची आवश्यकता असते. सूर्योदय फाउंडेशन ने सुरु केलेला हा चांगला सामाजिक उपक्रम असून शोषित व पीडित आणि दिव्यांगांना खऱ्या अर्थाने जगण्याचे बळ देणारा अत्यंत स्तुत्य असा हा उपक्रम आहे. " द सिटी ऑफ साऊंड" उपक्रमाला त्यांनी मनापासून शुभेच्छा दिल्या आणि अनुराधा पौडवाल यांचे अभिनंदन केले आणि आभार मानतो की त्यांनी इतका चांगला सामाजिक उपक्रम सुरू केलेला आहे असे गोरवोद्गार केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी काढले.

डॉ. अनुराधा पौडवाल  म्हणाल्या की, आज मला माझ्या गायनाच्या कारकिर्दीला ५० वर्षे पूर्ण होत आहेत. ज्या समाजाने आपल्याला एवढे प्रेम दिले, इतका सन्मान दिला. त्या समाजाचे आपण काही देणे लागतो. समाजाच्या प्रती आमचे काही दायित्व लागते. हेच सामाजिक दायित्व ओळखून आम्ही हा " द गिफ्ट ऑफ साऊंड" उपक्रम सुरु केलेला आहे. बहुतेक लोकांना हे माहीतच नसते की त्यांना कमी ऐकू येत आहे. काही मुलांना जन्मताच श्रवणदोष असतो. अशा मुलांसाठी आम्ही हा उपक्रम सुरु केला आहे. त्यासाठी मुंबई आणि देशातील महानगरपालिकेच्या शाळांमध्ये  शिकणाऱ्या मुलांचे आम्ही स्क्रीनिंग केले. आज मुंबईतील महानगर पालिका शाळांतील 120 मुलांना मोफत श्रवण यंत्र देण्यात आलेले आहे. सूर्योदय फाउंडेशन तर्फे सुरु करण्यात आलेला हा उपक्रम संपूर्ण देशभर नेण्याचे आमचे स्वप्न आहे आणि आम्ही ते स्वप्न लवकरच पूर्ण करू अशी ठाम ग्वाही त्यांनी दिली.

Web Title: Everyone needs to take the initiative to give strength to the oppressed, victims and disabled to live says Union Minister Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.