सर्वांना रेल्वे प्रवासाची मुभा, पण वेळेचे बंधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 04:23 IST2021-02-05T04:23:44+5:302021-02-05T04:23:44+5:30

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही मर्यादित घटकांना रेल्वे प्रवासाची मुभा आहे. रेल्वे प्रवास बंद असल्याने ...

Everyone is allowed to travel by train, but time constraints | सर्वांना रेल्वे प्रवासाची मुभा, पण वेळेचे बंधन

सर्वांना रेल्वे प्रवासाची मुभा, पण वेळेचे बंधन

लोकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर काही मर्यादित घटकांना रेल्वे प्रवासाची मुभा आहे. रेल्वे प्रवास बंद असल्याने सर्वसामान्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत होता. मात्र, आता १ फेब्रुवारीपासून गर्दी होणार नाही, अशा वेळा आखून सर्वसामान्य प्रवाशांसाठी उपनगरीय सेवा सुरू करण्याचे निर्देश मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिले आहेत.

विशिष्ट वेळांच्या मर्यादेत मुंबईतील लोकल सेवा सर्वांसाठी सुरू करण्यासंदर्भात नुकतीच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली वर्षा येथे बैठक झाली होती. यात वरिष्ठ रेल्वे अधिकारीदेखील उपस्थित होते.

दरम्यान, सर्वांसाठी लोकल प्रवासाची सुविधा नेहमीप्रमाणे सुरू करण्याची आवश्यकता लक्षात घेऊन मुंबई व उपनगर परिसरातील कार्यालये व आस्थापना यांनी आपापल्या कार्यालयीन वेळांत आवश्यक तो बदल करावा, अशी विनंती मुख्य सचिव यांनी यासंदर्भात जारी केलेल्या प्रसिद्धिपत्रकात केली आहे. यासंदर्भातील सूचना मुंबई व मुंबई महानगर क्षेत्रातील सर्व आयुक्त, पोलीस आयुक्त, जिल्हाधिकारी यांनाही कळविण्यात आली आहे.

* असा करता येणार प्रवास

सर्व प्रवाशांना सकाळच्या पहिल्या लोकलपासून सकाळी ७ वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ पासून दुपारी ४ पर्यंत आणि रात्री ९ पासून शेवटच्या लोकलपर्यंत प्रवास करता येईल.

* कधी करता येणार नाही प्रवास

सर्वसामान्य प्रवाशांना सकाळी ७ ते दुपारी १२ व दुपारी ४ ते रात्री ९ या कालावधीत उपनगरीय रेल्वे सेवांत प्रवास करता येणार नाही. या वेळात फक्त यापूर्वी परवानगी देण्यात आलेल्या विशिष्ट प्रवर्गातील प्रवासी प्रवास करू शकतील.

* रेल्वे मंत्रालयाकडून हिरवा कंदील

१ फेब्रुवारीपासून लोकल सर्वांसाठी खुली करण्यात येणार असल्याचे राज्य सरकारने सांगितले आहे. त्याला रेल्वे मंत्रालयाने हिरवा कंदील दाखवला आहे. या संदर्भात रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी ट्विट केले आहे.

गोयल यांनी म्हटले आहे की, मुंबईकरांनो, आपल्या सुविधेसाठी १ फेब्रुवारीपासून मुंबई लोकल ट्रेन सर्वसामान्य लोकांसाठी सुरू हाेईल. पहिली लोकल सुरू झाल्यापासून सकाळी सात वाजेपर्यंत तसेच दुपारी १२ वाजल्यापासून दुपारी चार वाजेपर्यंत आणि त्यानंतर रात्री नऊ वाजेपासून शेवटच्या लोकलपर्यंत सुरू करण्यात आली आहे.

महाराष्ट्र सरकारच्या आदेशानुसार सकाळी ७ ते १२, तसेच दुपारी चार ते रात्री नऊ वाजेपर्यंत मुंबई लोकल केवळ आवश्यक सेवांमधील कर्मचाऱ्यांसाठीच चालविल्या जातील. या वेळेत सामान्य प्रवाशांना लोकल प्रवासाची परवानगी नसेल. प्रवासादरम्यान आपण कोरोनासंबंधी सर्व नियमांचे पालन करावे, असे आवाहनही गोयल यांनी केले.

.................................

राज्य सरकारने १ फेब्रुवारीपासून सर्वांसाठी रेल्वे सुरू करण्याचा प्रस्ताव आम्हाला दिला होता. आम्ही तो रेल्वे बोर्डाकडे पाठविला असून त्याला रेल्वे बोर्डाने मंजुरी दिली आहे.

- शिवाजी सुतार, मुख्य जनसंपर्क अधिकारी, मध्य रेल्वे

.........................................

रेल्वे सुरू करण्यास परवानगी मिळाली आहे. काही एक्सलेटर आणि प्रवेशद्वारे बंद होती, ती सुरू करण्यात येणार आहेत. तसेच एटीव्हीएमची संख्या वाढविण्यात येईल.

- सुमित ठाकूर, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे

-------------------------

Web Title: Everyone is allowed to travel by train, but time constraints

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.