Join us  

31 मे रोजी विशेष ग्रामसभा बोलवावी, सुप्रिया सुळेंचं ग्रामविकास मंत्र्यांना पत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2022 8:52 PM

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांची भूमी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड या छोट्या गावानं एक महत्वाचा विचार महाराष्ट्राला दिला आहे

मुंबई/कोल्हापूर - विधवा महिलांना समाजात सन्मानाची वागणूक देण्याबाबत हेरवाड ग्रामपंचायतीने घेतलेला निर्णय कौतुकास्पद आहे. महाराष्ट्राच्या पुरोगामी विचाराला चालना देणारा हा निर्णय राजर्षी शाहू महाराजांच्या जिल्ह्यातून होत आहे याचा अभिमान आहे. या ठरावाचे कायद्यात रूपांतर करून या निर्णयाची अंमलबजावणी राज्यभर राबविण्याबाबत ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ व यशोमती ठाकूर यांच्याशी चर्चा करून निर्णय घेण्याचा विश्वास खासदार सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केला होता. त्यानंतर, आता त्यांनी हसन मुश्रिफ यांना पत्र पाठवून यासंदर्भात विशेष ग्रामसभा बोलवण्याची मागणी केली आहे. 

राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुरोगामी विचारांची भूमी असणाऱ्या कोल्हापूर जिल्ह्यातील हेरवाड या छोट्या गावानं एक महत्वाचा विचार महाराष्ट्राला दिला आहे. या गावानं विधवा प्रथा बंद करण्याचा क्रांतिकारी निर्णय घेतला. हा निर्णय आता राज्यपातळीवर राबविण्याची गरज आहे राज्याचे ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ यांना पत्र लिहून सुप्रिया सुळेंनी विनंती केली आङे. या विषयाची सामाजिक जाणिवेची भूमिका लक्षात घेता ३१ मे रोजी प्रत्येक ग्रामपंचायतीने विशेष ग्रामसभा बोलावावी. तसेच हेरवाडच्या धर्तीवर विधवा प्रथा निर्मूलनाचा ठरावा मंजूर करावा. यासाठी राज्याच्या ग्रामविकास खात्याने एक आदेश जारी करणे आवश्यक आहे. आपण याबाबत सकारात्मक विचार कराल हा विश्वास आहे, असे सुळेंनी पत्रात म्हटले आहे. 

सुप्रिया सुळेंनी घेतली महिला सदस्यांची भेट

हेरवाड (ता. शिरोळ) ग्रामपंचायतीने विधवा महिलांना सन्मानाची वागणूक मिळावी यासाठी विधवा प्रथा बंद करण्याचा ग्रामसभेत ठराव केला आहे. त्यामुळे या निर्णयाची राज्यभरात चर्चा होत असून निर्णयाचे सर्वच स्तरातून स्वागत होत आहे. या ठरावाची माहिती घेण्यासाठी खासदार सुप्रिया सुळे यांनी हेरवाड सरपंच सुरगोंडा पाटील, ग्रामसेवक, महिला सदस्या यांना सातारा येथील रयत शिक्षण संस्थेच्या सभागृहात बोलावून घेतले. खासदार सुळे यांनी सरपंच पाटील यांच्याकडून ठरावाची माहिती घेतली. या निर्णयाबाबत कौतुक करत सुमारे एक तासहून अधिक काळ वेळ देत सविस्तर चर्चा केली. या ठरावाला राजकीय आश्रय मिळाल्याने विधवा महिलांच्या सन्मानाच्या प्रक्रियेला गती मिळणार हे निश्चित आहे. 

टॅग्स :सुप्रिया सुळेहसन मुश्रीफग्राम पंचायतकोल्हापूर