Join us

“राज्य महोत्सव गणेशोत्सवाकरिता प्रत्येक शासकीय विभागाने सहभाग वाढवावा”: आशिष शेलार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2025 15:22 IST

Ashish Shelar News: राज्याभरातील १८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मिळणार २५ हजार भांडवली अनुदान वितरण करण्यात येणार आहे.

Ashish Shelar News: यावर्षीपासून प्रथमच गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा देण्यात आलेला आहे. यानिमित्ताने राज्यात विविध सांस्कृतिक कार्यक्रम व उपक्रमांचे आायोजन करण्यात येत आहे. याचाच एक भाग म्हणून राज्याभरातील १८०० भजनी मंडळांना भजन साहित्य खरेदीसाठी मिळणार रु. २५ हजार भांडवली अनुदान वितरण करण्यात येणार आहे, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी दिली. याबाबतचे ऑनलाईन अर्ज दिनांक २३ ऑगस्ट, २०२५ ते ०६ सप्टेंबर, २०२५ या कालावधीत https://mahaanudan.org या वेबपोर्टलवर उपलब्ध आहेत. जास्तीत जास्त भजनी मंडळांनी या अनुदानाचा लाभ घ्यावा, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी केले आहे.

शासनाने गणेशोत्सवाला “राज्य महोत्सव” घोषित केले आहे. गणेशोत्सव हा महाराष्ट्राची सांस्कृतिक ओळख आहे.  समाजातील प्रत्येक व्यक्ती गणेशोत्सव साजरा करतातच. आता गणेशोत्सव हा उत्सव प्रथमच राज्य शासन साजरा करत असल्याने हा उत्सव आता अधिक व्यापक प्रमाणात साजरा करून त्यात लोकसहभाग वाढवावा. यासाठी  प्रत्येक विभागांनी विविध उपक्रमातून आपली सहभागीता वाढवून आपापल्या समाज माध्यमांवर मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी करावी, असे निर्देश सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी उपस्थित सर्व राज्य आणि केंद्र सरकारी अधिकाऱ्यांना दिले. सांस्कृतिक कार्य मंत्री शेलार यांच्या उपस्थितीत राज्य तसेच केंद्र शासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत वांद्रे येथे बैठक झाली. 

विषय घेऊन कार्यक्रम राबविण्यात यावे

गणेशोत्सव केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित न राहता २२ देशांमध्ये साजरा होतो. सार्वजनिक तसेच घरगुती पद्धतीने आणि आता राज्य शासनामार्फतही साजरा होणारा हा गणेशोत्सव सर्व धर्म, जात, भाषांना जोडणारा उत्सव असावा. या गणेशोत्सव काळात तालुका ते राज्य स्तरावरील विविध सांस्कृतिक स्पर्धांसाठी 10 कोटी रुपयांची बक्षिसे ठेवली जाणार असून सोशल मीडियावरून विशेष मोहीम राबवली जावी. गणेशोत्सवाच्या निमित्ताने प्रत्येक विभागाने नाट्य, संगीत, सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करावेत. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या संकल्पनेतील वल्ड युनोस्कोचा दर्जा मिळालेले छत्रपती शिवाजी महाराज यांचे गडकिल्ले, ऑपरेशन सिंदूर, आत्मनिर्भर भारत, स्वदेशी संकल्पना असे विषय घेऊन कार्यक्रम राबविण्यात यावे. घरगुती व सार्वजनिक गणेशोत्सवाचे फोटो-व्हिडिओ जगभरातून अपलोड करता यावेत, यासाठी विशेष प्लॅटफॉर्म तयार करण्यात येत असून यात प्रमुख मंडळांचे थेट प्रक्षेपण सुद्धा उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर चित्रपट महोत्सव, शैक्षणिक कार्यक्रम आदी विषयांवर निबंध, चित्रकला, ब्लॉग स्पर्धा आयोजित करण्यात याव्यात, असेही निर्देश त्यांनी दिले. 

दरम्यान, गणेशोत्सवाच्या १० दिवसाच्या काळात आपल्याला विभागात विशेष उपक्रम, स्पर्धा, रोषणाई आदींसह विशेष उपक्रम अंतर्गत ऑपरेशन सिंदूरद्वारे माजी सैनिकांचा जिल्हानिहाय सत्कार करण्यात यावा आणि आत्मनिर्भर भारत व स्वदेशी संकल्पना यांचा गौरव करण्यात यावा, असेही निर्देश मंत्री शेलार यांनी या बैठकीत दिले. गणेशोत्सवाला राज्य महोत्सव दर्जा मिळाल्याने महाराष्ट्राच्या सांस्कृतिक ओळखीत भर पडली आहे. लोकसहभाग, डिजिटल प्रसार, आंतरराष्ट्रीय पातळीवरील मान्यता आणि पर्यावरणपूरक उपक्रम यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता जगाला एकत्र आणणारा सांस्कृतिक सोहळा ठरणार असल्याचे मंत्री शेलार यांनी प्रतिपादन केले.

 

टॅग्स :गणेशोत्सव 2025गणेश चतुर्थीराज्य सरकारगणपती 2025गणपती उत्सव २०२५