जागेसाठी जीवघेणी स्पर्धा थांबणार कधी?

By Admin | Updated: May 19, 2015 00:27 IST2015-05-18T22:49:06+5:302015-05-19T00:27:59+5:30

प्रवाशांचा सवाल : कोकण रेल्वतील जनरल बोगीमध्ये दररोज बाचाबाची, हाणामारी

Evergreen competition for the place? | जागेसाठी जीवघेणी स्पर्धा थांबणार कधी?

जागेसाठी जीवघेणी स्पर्धा थांबणार कधी?

रामचंद्र कुडाळकर - तळवडे--कोकण रेल्वे कोकणातून जाते. परंतु कोकणी माणसाला कोकण रेल्वेने प्रवास करताना वेगळाच अनुभव येतो. मुंबई ते गोवा दरम्यानच्या कोकण रेल्वेच्या प्रवासात कोण कोणाचा नसतो. पॅसेंजर डब्यात चढताना प्रत्येक व्यक्ती आपला स्वार्थ बघते. यातून भांडणे-तंटेही होतात. कोकणकन्या एक्सप्रेसमध्ये तर स्पर्धाे तीव्र असते. गणेश चतुर्थी अथवा उन्हाळी सुट्टीच्या दरम्यान तर ही समस्या अधिक गंभीर बनत चालली आहे. जनरलमध्ये या दररोजच्या भांडणामुळे अनेक प्रवासी पाठ फिरवायला लागले आहेत. याला आळा घालावा, अशी मागणी सर्व थरातून होत आहे.कोकणकन्या गाडीला जादा प्रवासी डबे जोडण्यासाठी ग्राहक संघटनेने वेळोवेळी अर्ज केले, विनंत्या केल्या. परंतु त्याबाबत समाधानकारक उत्तरे मिळाली नाहीत. त्यामुळे कोकणातून जाणाऱ्या कोकणी माणसाला समाधानकारक आणि सुरक्षित प्रवास मिळेल काय, याबाबत साशंकताच आहे. आता तर सावंतवाडी-मळगाव रेल्वेस्थानकावर रेल्वे टर्मिनस साकारत आहे. त्यादृष्टीने कोकणकन्या, मांडवी एक्स्प्रेस आदी गाड्यांमध्ये रेल्वे प्रवाशांसाठी सुविधा वाढविणे तसेच जादा प्रवासी डब्यांची तरतूद होणे आवश्यक आहे. कोकण रेल्वे प्रशासनाला कोकणचे सुपुत्र रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या माध्यमातून खंबीर नेतृत्व लाभले आहे. त्यादृष्टीने जादा प्रवास करणाऱ्या कोकणकन्या व मांडवी एक्स्प्रेस गाडीत प्रवाशांच्या दृष्टीने बदल होणे गरजेचे आहे. कोकणकन्या एक्स्पे्रस या गाडीतून मुंबईहून मडगावकडे प्रवास करायचा म्हटल्यास, कोकणकन्या गाडी मुंबई छत्रपती टर्मिनस येथून रात्री ११.५५ वाजता सुटते. परंतु या गाडीत गोवा येथे जाण्यासाठी पनवेल येथूनच जनरल डब्यात बसून प्रवासी येतात. गाडी सीएसटीकडे येतानाच खचाखच भरलेली असते. त्यामुळे सीएसटी येथे दादर, ठाणे व पनवेल असा परतीचा प्रवास करतेवेळी जनरल डब्यातील प्रवाशांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. कारण डब्यात पाय ठेवायला जागा नसते. जागेच्या वादातून भांडण-तंटे आणि कधी कधी मारामारी यासारखे जीवघेणे प्रकारही घडतात. यात एखाद्या प्रवाशाचा जीवही जाऊ शकतो.
कोकणवासी प्रवाशांची ही समस्या कोण मिटवणार, असा प्रश्न उपस्थित होतो. जनरल डब्यात चढताना प्रवासी दुसऱ्याची जराही पर्वा करत नाहीत. गर्दी एवढी असते की, कोण काय करतोय तेही समजायला वेळ नसतो. हंगाम असो अथवा नसो, कोकणकन्या एक्स्प्रेसच्या प्रवासी डब्यात तर शौचालयावर बसूनही लोक प्रवास करतात, यावरून गंभीर परिस्थितीचे आकलन होते. कोकण रेल्वेने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची मागणी होत आहे.


रेल्वेमंत्र्यानी गांभीर्य ओळखावे
सध्या कोकणचे सुपुत्र सुरेश प्रभू केंद्रीय रेल्वेमंत्रीपदी विराजमान आहेत. यापूर्वी कोकणचेच सुपुत्र मधु दंडवते केंद्रीय रेल्वेमंत्री असताना त्यांच्या प्रयत्नातून कोकण रेल्वेचे स्वप्न साकार झाले होते. आताही प्रभू यांच्या माध्यमातून कोकणरेल्वेचा विकास व्हावा, अशी कोकणवासीयांची इच्छा आहे. यासाठी रेल्वेमंत्र्यांनी प्रवाशांच्या समस्यांचे गांभीर्य ओळखून ठोस पावले उचलणे आवश्यक आहे.


जादा डबे जोडणे आवश्यक
या प्रवाशांमुळे कोकण रेल्वेचा विकास झाला, आर्थिक फायदा झाला, त्या रेल्वेप्रवाशांच्या हिताच्या दृष्टीने कोकण रेल्वे प्रशासनाने ठोस पाऊल उचलणे गरजेचे आहे. त्यामुळे कोकणकन्या एक्स्प्रेस आणि मांडवी एक्स्प्रेस या गाड्यांना जादा पॅसेंजर डबे जोडणे आवश्यक आहे. तरच प्रवाशांच्या तोबा गर्दीवर नियंत्रण ठेवता येईल. अन्यथा वाढत्या प्रवाशांमुळे कोकणकन्या गाडीचा प्रवास एखादेवेळी जीवघेणाही ठरू शकतो, असे मत प्रवाशांमधून व्यक्त होत आहे.

Web Title: Evergreen competition for the place?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.