Join us
Daily Top 2Weekly Top 5

रेसकोर्सवरील थीम पार्कवर पुन्हा ‘इव्हेंट’; काम सुरू होईपर्यंत कार्यक्रमांसाठी देणार भाड्याने

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2025 05:41 IST

महालक्ष्मी येथील रेसकोर्सवरील १२० एकर जागा वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबकडून जून २०२४ ला पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर या जागेवर सेंट्रल पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.

मुंबई : महालक्ष्मी येथील रेसकोर्सच्या १२० एकरच्या जागेवर थीमपार्क उभारण्यासाठी ही जागा मुंबई महापालिकेने ताब्यात घेतल्यानंतर ती सध्या मोकळी आहे. तर, थीमपार्क उभारण्यासाठी प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही जागा कार्यक्रमांसाठी (इव्हेंट) देण्याचा निर्णय पालिकेने घेतला आहे. यासाठी दिवसाला १२ लाख १५ हजार रुपये शुल्क घेतले जात आहे. आतापर्यंत मोठ्या व्यावसायिक कंपन्यांचे या जागेवर  इव्हेंट झाले आहेत. पावसाळ्यात बंद ठेवण्यात आलेले  हे इव्हेंट आता पावसानंतर नोव्हेंबरमध्ये पुन्हा सुरू केले जाणार आहे. त्यानुसार तीन इव्हेंट बुकही झाले आहेत. एका इव्हेंटसाठी ८० लाख रुपये आकारले जाणार आहे.

आराखडा तयार करण्यासह इतर प्रक्रिया सुरू

महालक्ष्मी येथील रेसकोर्सवरील १२० एकर जागा वेस्टर्न इंडिया टर्फ क्लबकडून जून २०२४ ला पालिकेच्या ताब्यात आल्यानंतर या जागेवर सेंट्रल पार्क उभारण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. याबाबत  आराखडा व इतर प्रक्रिया सुरू आहे. तयार केल्या जाणाऱ्या आराखड्यामध्ये रेसकोर्सची १२० एकर आणि कोस्टल रोडची सुमारे १८० एकर जागा मिळून एकूण ३०० एकर जागा उपलब्ध असेल.

 ताब्यात आलेल्या १२० जागेवर थीम पार्क उभारले जाणार आहे. सध्या महसूल वाढीच्या उद्देशाने थीम पार्कची प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत ही जागा शुल्क आकारून व्यावसायिक कार्यक्रमांसाठी देण्याचा निर्णय पालिकेने घेतला. एका कार्यक्रमासाठी प्रत्येक दिवशी सुमारे १२ लाख ५० हजारावर रुपये आकारले जात आहे. 

एका व्यावसायिक कार्यक्रमासाठी या जागेवर आधी तयारीसाठी द्यावी लागते. एक दिवस कार्यक्रम असतो. मात्र, त्याआधी संबंधितांना तयारी करावी लागते. त्यासाठी तीन ते १० दिवस ही जागा कार्यक्रम आयोजकांच्या ताब्यात राहते. 

२०% अनामत रक्कम

कार्यक्रम झाल्यानंतर त्याकडे दुर्लक्ष होऊ शकते. कार्यक्रमादरम्यान या जागेची नासधूस होऊ शकते. त्यामुळे ही जागा पूर्वस्थितीत करण्याची जबाबदारी संबंधित कार्यक्रम आयोजकांकडे देण्यात आली आहे. यासाठी २० टक्के अनामत रक्कमही आकारली जाते.