Join us
Daily Top 2Weekly Top 5

कमी मद्यपानामुळेही तोंडाच्या कर्करोगाचा धोका; ‘टाटा मेमोरियल’च्या अभ्यासातील निष्कर्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 25, 2025 06:37 IST

ओपन ॲक्सेस जर्नल बीएमजे ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार रोज एका मानक मद्यपान तरी तोंडाच्या, विशेषतः बक्कल म्यूकोसा (गालांच्या आतल्या भागातील) कर्करोगाचा धोका सुमारे ५० टक्क्यांनी वाढतो.

लोकमत न्यूज नेटवर्क मुंबई : मद्यपेयांचे  कमी प्रमाणात नियमित सेवन केले तरी तोंडाच्या कर्करोगाचा धोका वाढतो, असा निष्कर्ष मुंबईतील टाटा मेमोरियल सेंटरच्या खारघरच्या सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीने (ॲक्ट्रेक) एका अभ्यासातून काढला आहे. 

ओपन ॲक्सेस जर्नल बीएमजे ग्लोबल हेल्थमध्ये प्रकाशित अभ्यासानुसार रोज एका मानक मद्यपान तरी तोंडाच्या, विशेषतः बक्कल म्यूकोसा (गालांच्या आतल्या भागातील) कर्करोगाचा धोका सुमारे ५० टक्क्यांनी वाढतो. यामध्ये महुआ, ताडी, देशी दारू या मद्यांचा धोका सर्वाधिक असल्याचे स्पष्ट झाले. 

तंबाखू सेवन, मद्यपानामुळे कर्करोगाचा धोका चार पट 

२०१० ते २०२१ या कालावधीत बक्कल म्युकोसा कर्करोग निदान झालेल्या १,८०३ रुग्णांची तुलना १,९०३ निरोगी व्यक्तींशी करण्यात आली.  अभ्यासात ११ आंतरराष्ट्रीय व ३० स्थानिक मद्यप्रकारांचा समावेश होता. अभ्यासातून असेही स्पष्ट झाले की, तंबाखू सेवन आणि मद्यपान या दोन्ही सवयी एकत्र असतील, तर तोंडाच्या कर्करोगाचा धोका चार पटीने वाढतो. 

अभ्यासातून काय अधोरेखित झाले?टाटा मेमोरियल सेंटरचे संचालक डॉ. सुदीप गुप्ता यांनी सांगितले, मद्यपेयांना आंतरराष्ट्रीय स्तरावर ‘गट-१ कर्करोगकारक’ म्हणून वर्गीकृत केले आहे. ॲक्ट्रेकचे संचालक डॉ. पंकज चतुर्वेदी यांनी देशी मद्याच्या बाजारपेठेवर नियंत्रण नसल्याकडे लक्ष वेधले. सेंटर फॉर कॅन्सर एपिडेमिओलॉजीचे संचालक डॉ. राजेश दीक्षित यांच्या मते, भारतातील बक्कल म्युकोसा कर्करोगाच्या सुमारे ११.५ टक्के प्रकरणे थेट मद्यपानाशी संबंधित आहेत.

बक्कल म्युकोसाचे प्रमाण लक्षणीय भारतामध्ये तोंडाचा कर्करोग हा दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक आढळणारा कर्करोग आहे. संशोधकांच्या मते दरवर्षी अंदाजे १,४३,७५९ नवीन रुग्ण आढळतात व ७९,९७९ मृत्यू या आजारामुळे होतात.  भारतीय पुरुषांमध्ये दर १ लाखांमागे सुमारे १५ इतका त्याचा प्रसार आहे. भारतात तोंडाच्या कर्करोगाचा प्रमुख प्रकार हा गालांच्या व ओठांच्या आतल्या मऊ गुलाबी आवरणाचा (बक्कल म्युकोसा) कर्करोग आहे.

English
हिंदी सारांश
Web Title : Even Low Alcohol Consumption Increases Oral Cancer Risk: Study

Web Summary : Tata Memorial study reveals even light drinking escalates oral cancer risk, especially affecting the inner cheeks. The risk is amplified fourfold with tobacco use. Indigenous alcohol poses a significant threat. Approximately 11.5% of oral cancer cases are linked to alcohol consumption.
टॅग्स :कर्करोग