मेडिकल परीक्षेलाही पेपरफुटीची बाधा, खबरदारी म्हणून ऐन वेळी बदलला फार्माकॉलॉजी-२ चा पेपर
By संतोष आंधळे | Updated: December 5, 2024 05:20 IST2024-12-05T05:20:15+5:302024-12-05T05:20:43+5:30
पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्याने हा पेपर १९ डिसेंबरला पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला.

मेडिकल परीक्षेलाही पेपरफुटीची बाधा, खबरदारी म्हणून ऐन वेळी बदलला फार्माकॉलॉजी-२ चा पेपर
संतोष आंधळे
मुंबई : सध्या राज्यात ६२ वैद्यकीय महाविद्यालयात एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाच्या परीक्षा सुरू आहेत. सोमवारी फार्माकॉलॉजी-१ या विषयाचा पेपर झाला. मात्र, तो फुटल्याची खातरजमा होताच ही परीक्षा पुन्हा घेण्याचा निर्णय विद्यापीठ प्रशासनाने घेतला.
याची चौकशी सुरू असताना बुधवारी फार्माकॉलॉजी-२ हा पेपर फुटला असल्याची माहिती मिळाली. मात्र, ती अफवा असल्याचे समजले. तरी दक्षतेचा भाग म्हणून विद्यापीठाने सर्व वैद्यकीय महाविद्यालयांना दुपारी दोन वाजता सुरू होणारा पेपर ३ वाजता घेण्याच्या सूचना देत नवी प्रश्नपत्रिका ई-मेलवर पाठवून ती देण्याची सूचना केली.
विद्यार्थ्यांनी सोमवारी फार्माकॉलॉजी-१ विषयाचा पेपर दिला. मात्र, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाला हा पेपर फुटल्याची माहिती मिळाल्याने त्यांनी तत्काळ या प्रकरणाची प्राथमिक माहिती घेतली. पेपर फुटल्याचे स्पष्ट झाल्याने हा पेपर १९ डिसेंबरला पुन्हा घेण्याचा निर्णय घेतला. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत असून, राज्यातील सर्व परीक्षा केंद्राचे व्हिडीओ फुटेज विद्यापीठाने मागविले आहे.
विद्यार्थ्यांना मनस्ताप
महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या अखत्यारित ६२ वैद्यकीय महाविद्यालये येतात. त्यामध्ये सुमारे ५८०० विद्यार्थी या परीक्षेला बसले आहेत. सोमवारी पेपरफुटीचा प्रकार घडल्यानंतर तो पेपर पुन्हा विद्यापीठाला घ्यावा लागणार आहे. या अशा घटनांमुळे गुणवंत विद्यार्थ्यांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो.
तीन ठिकाणी तक्रारी
स्थानिक म्हसरूळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे. याशिवाय सायबर सेल शाखेत तक्रार दाखल करून या प्रकरणाच्या ऑनलाइन प्रवासाची तपासणी केली जाते आहे. तसेच गुन्हे शाखेतही या प्रकरणी तपास सुरू झाला आहे.
- डॉ. संदीप कडू, परीक्षा नियंत्रक
सोमवारी फुटलेला पेपर पुन्हा घेण्यात येणार आहे. त्या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येत आहे. बुधवारीसुद्धा पेपर फुटल्याची माहिती समाजमाध्यमांवर फिरवली जात होती. मात्र, पेपर फुटला ही केवळ अफवा होती. मात्र, दक्षता म्हणून आम्ही दुपारी दोनचा पेपर तीनला सुरू करण्याच्या सूचना देऊन नवी प्रश्नपत्रिका सर्व परीक्षा केंद्रांना पाठविली.
- डॉ. माधुरी कानिटकर, कुलगुरू, महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठ