स्मशानातही इच्छुक उमेदवार म्हणतो ‘लक्ष असू द्या’! उमेदवारीची वाट न पाहता मुलुंडमध्ये प्रचारास सुरुवात
By मनीषा म्हात्रे | Updated: December 27, 2025 10:04 IST2025-12-27T10:04:24+5:302025-12-27T10:04:53+5:30
एका कुटुंबातील व्यक्तीचा अंत्यविधी सुरू होता. स्मशानभूमीत नेहमीप्रमाणे गंभीर शांतता, शोकाकुल चेहरे आणि मंत्रोच्चार सुरू होते. त्याच वेळी, एका इच्छुक उमेदवाराने त्या प्रभागातील प्रमुखाची नजर पडताच, ‘साहेब, लक्ष असू द्या’ असे म्हटले. शोकाकुल वातावरणात राजकीय सूर मिसळल्याचा तो क्षण अनेकांना खटकला.

स्मशानातही इच्छुक उमेदवार म्हणतो ‘लक्ष असू द्या’! उमेदवारीची वाट न पाहता मुलुंडमध्ये प्रचारास सुरुवात
मनीषा म्हात्रे
लोकमत न्यूज नेटवर्क
मुंबई : युती, आघाडीत अजून जागावाटपाच्या वाटाघाटी सुरू असताना इच्छुक उमेदवारांनी मात्र वैयक्तिक पातळीवर प्रभागात भेटीगाठींद्वारे प्रचारास सुरुवात केली आहे.
गल्लीबोळ, चहाच्या टपऱ्या, सोसायट्यांच्या पायऱ्या, असे कुठेही भेट झाली, की एकच वाक्य हमखास ऐकू येते ‘लक्ष असू द्या.’ ही मोहीम इतकी व्यापक झाली आहे, की वेळ, जागा, प्रसंग न पाहता मुलुंडमध्ये अंत्ययात्रेला गेलेल्या एका इच्छुक उमेदवाराने स्मशानातही ‘लक्ष असू द्या,’ अशी साद तेथे लोकांना घातली.
एका कुटुंबातील व्यक्तीचा अंत्यविधी सुरू होता. स्मशानभूमीत नेहमीप्रमाणे गंभीर शांतता, शोकाकुल चेहरे आणि मंत्रोच्चार सुरू होते. त्याच वेळी, एका इच्छुक उमेदवाराने त्या प्रभागातील प्रमुखाची नजर पडताच, ‘साहेब, लक्ष असू द्या’ असे म्हटले. शोकाकुल वातावरणात राजकीय सूर मिसळल्याचा तो क्षण अनेकांना खटकला.
कुठे साई पालखी, तर कुठे ख्रिसमस सेलिब्रेशन
उमेदवार प्रत्येक धर्मीयांच्या कार्यक्रमात हजेरी लावून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे विविध मंदिरात उमेदवारांची लगबग वाढली आहे. काहीजण साई पालखीत सहभागी होण्याबरोबरच चर्चमध्ये ख्रिसमस साजरा करताना दिसले.
मतदार याद्या तयार ठेवा...
कार्यकर्त्यांना बूथच्या याद्या घेऊन कुठला मतदार कुठे आहे? याचा आढावा घेण्याची जबाबदारी दिली आहे. त्यानुसार कार्यकर्ते, पदाधिकारी याद्या घेऊन तयारीत आहेत.
दुसरीकडे इच्छुकांमधील प्रबळ दावेदारांना उमेदवारी अर्जासोबत लागणारे कागदपत्रे घेऊन तयार राहायला सांगून स्थानिक पातळीवर लक्ष ठेवून राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.
मॉर्निंग वॉक ते शाळा,
महाविद्यालयांबाहेर ‘हाय-हॅलो...!’
उद्याने, मैदाने, चाळी, निवासी वस्त्या गाठत इच्छुक उमेदवारांचा रंगलेला मूड दिसून येत आहे. मॉर्निंग वॉक करतच मतदारांच्या गाठीभेटी घेणे सुरू आहे. काही ठिकाणी शाळा, कॉलेजबाहेरही गर्दी पाहून इच्छुक उमेदवारांची वाहने थांबताना दिसत आहेत. बच्चे कंपनीला ‘हाय- हॅलो’ करण्याबरोबर पालकांना ‘लक्ष असू द्या,’ असे म्हणल्याशिवाय त्यांची गाडी हलत नाही.
बहुभाषिक मतदारसंघ म्हणून ओळख असलेल्या उत्तर-पूर्व मुंबईत बाराच्या ठोक्याला घराबाहेर पडणारी नेतेमंडळी आता सकाळी सहालाच घराबाहेर पडताना दिसत आहेत. उद्यानात तरुणांसोबत सेल्फीचाही मोह काही इच्छुकांना आवरता आला नाही. मॉर्निंग वॉकनंतर कार्यकर्त्यांच्या भेटीगाठींचे सत्र सुरू आहे. त्यानंतर कार्यकर्त्यांसोबत बैठका घेत दुपारी ४ वाजल्यापासूनच विविध छोट्या-मोठ्या कार्यक्रमात लोकांच्या भेटीगाठी सुरू आहेत; तर काहीजण रात्री उशिरापर्यंत परिसरात पायपीट करताना दिसत आहेत. कधी न फिरकलेले लोक आता डोंगराळ भागातील घरांपर्यंत जाताना दिसत आहेत.