Join us

फेरीवालेसुद्धा अभिमानाने व्यवसाय करणार, १ लाख फेरीवाल्यांना १० हजारांचे कर्ज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 20, 2023 07:02 IST

कोरोनामुळे आर्थिक गणित बिघडलेल्या फेरीवाल्यांना मदतीचा हात

लाेकमत न्यूज नेटवर्क

मुंबई : कोरोनामुळे आर्थिक गणित बिघडलेल्या फेरीवाल्यांच्या व्यवसायावर परिणाम झाला असून, या फेरीवाल्यांना कर्जाच्या माध्यमातून मदतीचा हात देण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. त्यासाठी पंतप्रधान स्वनिधी योजने अंतर्गत फेरीवाल्यांनी १० हजारांच्या बिनव्याजी कर्जासाठी पालिकेकडे अर्ज केले असून, मुंबईतील १ लाख  फेरीवाल्यांना या कर्जाचे वितरण करण्यात आले आहे. वितरण सोहळा गुरुवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत पार पडला.

फेरीवाल्यांना सुलभ रीतीने कर्ज मिळावे यासाठी सुरू करण्यात आलेल्या पंतप्रधान स्वनिधी योजनेंतर्गत मुंबईतील १ लाख २१ हजार ६५६ फेरीवाल्यांनी पालिकेकडे अर्ज केले होते. त्यातील ९९ हजार ५९८ फेरीवाले कर्जासाठी पात्र ठरले आहेत.  फेरीवाल्यांना व्यवसायासाठी कर्ज देण्यासाठी पंतप्रधान स्वनिधी योजनेची महापालिकेकडून अंमलबजावणी करण्यात आली. या योजनेंतर्गत पात्र फेरीवाल्यांना १० ते ५० हजारापर्यंत कर्ज दिले जाणार आहे.

असे मिळते कर्ज

इच्छुक फेरीवाल्यांना सुरुवातीला १० हजार रुपये कर्ज दिले जाते. वेळेत कर्जाची परतफेड करणाऱ्या फेरीवाल्यांनी पुन्हा कर्जाची मागणी केल्यास २० हजारांपर्यंत कर्ज मंजूर केले जाते. जर २० हजार कर्जही वेळेत परत केले, तर पुन्हा ५० हजार रुपये कर्ज दिले जाते. पालिकेने या योजनेसाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन केल्यानंतर फेरीवाल्यांचा चांगला प्रतिसाद मिळाला. 

टॅग्स :मुंबईफेरीवालेमुंबई महानगरपालिका