बारा वर्षांनंतरही गावदेवी मंडई अनधिकृतच!
By Admin | Updated: August 26, 2014 23:59 IST2014-08-26T23:59:03+5:302014-08-26T23:59:03+5:30
तब्बल १२ वर्षांच्या एका तपानंतर लोकार्पण झालेली गावदेवी भाजी मंडईची उभारणी पालिकेने अनधिकृतरीत्या केल्याची माहिती स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली आहे.

बारा वर्षांनंतरही गावदेवी मंडई अनधिकृतच!
ठाणे : तब्बल १२ वर्षांच्या एका तपानंतर लोकार्पण झालेली गावदेवी भाजी मंडईची उभारणी पालिकेने अनधिकृतरीत्या केल्याची माहिती स्थायी समितीच्या बैठकीत उघड झाली आहे. या मंडईचा सातबाराच पालिकेच्या नावावर नसल्याने ती उभारलीच कशी, असा सवाल विरोधी गटाने उपस्थित करून प्रशासनाला धारेवर धरले.
विशेष म्हणजे लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागण्याआधी घाईघाईत या मंडईचा लोकार्पण सोहळा शिवसेना युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते झाला होता. परंतु ते लोकार्पणसुद्धा बेकायदा असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.
गावदेवी मैदानाला लागूनच ६० वर्षे जुनी मंडई आहे. परंतु मैदानाचा काही भाग या मंडईने व्यापल्याने महापालिकेने येथील राखीव भूखंडावर मंडई उभारण्याचा मानस व्यक्त केला. २००३ च्या सुमारास त्याच्या कामाला सुरुवात झाली. यावेळी तळमजल्यावर ८० गाळे बांधण्यात आले. परंतु प्रत्यक्षात १५४ गाळेधारक असल्याने उर्वरितांनी त्या ठिकाणी बसण्यास विरोध केला. त्यामुळे सर्वच विक्रेते हे जुन्या जागेत व्यवसाय करीत होते. त्यामुळे १० वर्षे हे गाळे धूळ खात पडून होते. त्यातच ही जागा अपुरी असल्याने पुढच्या जागेत मंडई वाढविण्याचा मतप्रवाह पुढे आला. परंतु, गोदामाचा अडसर या ठिकाणी होता. गोदाम पाडण्याची परवानगी मिळाल्यानंतर पालिकेने २० नोव्हेंबर २०११ रोजी या कामाचा नारळ फोडला. दोन मजली मंडईमध्ये तळमजल्यावर गाळेधारकांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित झाले. १८ महिन्यांत हे काम पूर्ण होणार होते. यासाठी ४ कोटी ८५ लाखांचा खर्च अपेक्षित धरून काम सुरू केले. परंतु त्याला प्रत्यक्षात सव्वादोन वर्षांचा कालावधी लागला.
त्यानंतर ही मंडई उभारून तयार झाली. परंतु प्रत्यक्षात येथील पाणी आणि विजेची कामे आणि अंतर्गत कामेही अपूर्ण अवस्थेत असताना लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागेल या भीतीने आणि या कामाचे श्रेय मिळावे म्हणून विद्यमान खासदार राजन विचारे यांनी या मंडईचा लोकार्पण सोहळा ४ मार्च रोजी शिवसेनेचे युवासेना अध्यक्ष आदित्य ठाकरे यांच्या हस्ते उरकला.