Join us
Daily Top 2Weekly Top 5

सर्व रेल्वेस्थानकांबाहेर आता ईव्ही बॅटरी स्टेशन, आवश्यक परवानग्यांची पश्चिम रेल्वेला प्रतीक्षा

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 9, 2025 12:59 IST

मुंबई पश्चिम रेल्वेने त्यांच्या सर्व स्थानकांच्या बाहेर  ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याची योजना आखली आहे. आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्यावर या सुविधा उभारण्यात येणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

मुंबई - पश्चिम रेल्वेने त्यांच्या सर्व स्थानकांच्या बाहेर  ईव्ही बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याची योजना आखली आहे. आवश्यक परवानग्या प्राप्त झाल्यावर या सुविधा उभारण्यात येणार आहेत, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. सध्या मुंबई सेंट्रल, सांताक्रूझ, वांद्रे, प्रभादेवी यासह काही अन्य रेल्वेस्थानकांबाहेर ही सुविधा सुरू करण्यात आली आहे. त्यातील मुंबई सेंट्रल स्टेशनबाहेरील सुविधा केंद्राच्या कंत्राटाची मुदत संपली असून त्यासाठी नव्याने निविदा काढण्यात येणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

केंद्र शासनाच्या इलेक्ट्रिक वाहन धोरणाला प्रोत्साहन देण्यासाठी पश्चिम रेल्वेकडून विविध उपक्रम राबविले जात आहेत. बॅटरी स्टेशनमुळे पश्चिम रेल्वेच्या महसुलातही भर पडेल. तसेच पर्यावरण संवर्धनासोबतच स्मार्ट लास्ट-माईल कनेक्टिव्हिटीलाही चालना मिळेल, असे त्यांचे म्हणणे आहे.

या सुविधेमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी आणि तीन चाकी वापरकर्ते दोन मिनिटांपेक्षा कमी वेळात त्यांची संपलेली पॉवर पॅक ई-बॅटरी पूर्णपणे चार्ज झालेल्या बॅटरीने बदलू शकतील. सर्व ई-स्वॅप युनिट्स सुरक्षा, तांत्रिक आणि पर्यावरणीय मानकांनुसार स्थापित केले जातील.

मेट्रो, मोनो स्टेशनबाहेरही बॅटरी स्वॅपिंग सुविधाकाही दिवसांपूर्वीच, महा मुंबई मेट्रोने मुंबईतील २५ मेट्रो स्टेशन आणि ६ मोनोरेल स्टेशनवर ई-स्वॅप बॅटरी स्वॅपिंग स्टेशन उभारण्याचा निर्णय घेतला आहे, त्यापैकी पहिले स्टेशन दहिसर पूर्व मेट्रो स्टेशनवर सुरू झाले आहे. शहरातील डिलिव्हरी एजंट आणि फ्लीट ऑपरेटरसारख्या दैनंदिन ईव्ही वापरकर्त्यांना या सुविधेचा वापर करणे खूप सोयीस्कर ठरणार आहे. 

भविष्याची गरज हरित पायाभूत सुविधा ही भविष्याची गरज आहे. रेल्वे स्थानकांवर बॅटरी स्वॅपिंगसारख्या उपक्रमांमुळे पर्यावरणपूरक वाहतुकीला चालना मिळेल. डिलिव्हरी एजंट, दैनंदिन प्रवासी आणि फ्लीट ऑपरेटरना ईव्हीकडे आकर्षित करण्यास मदत करेल.विनीत अभिषेक, मुख्य जनसंपर्क अधिकारी, पश्चिम रेल्वे. 

टॅग्स :मुंबई