डेंग्यूच्या संशयास्पद मृत्यूंसाठी चौकशी समितीची स्थापना

By Admin | Updated: November 10, 2016 05:27 IST2016-11-10T05:27:28+5:302016-11-10T05:27:28+5:30

खासगी रुग्णालये, प्रयोगशाळांनी आपल्या येथील डेंग्यूच्या रुग्णांवरील उपचार आणि चाचण्यांबाबतचा अहवाल दैनंदिन तत्वावर संबंधित महापालिकेच्या

Establishment of inquiry committee for suspicious deaths of dengue | डेंग्यूच्या संशयास्पद मृत्यूंसाठी चौकशी समितीची स्थापना

डेंग्यूच्या संशयास्पद मृत्यूंसाठी चौकशी समितीची स्थापना

मुंबई : खासगी रुग्णालये, प्रयोगशाळांनी आपल्या येथील डेंग्यूच्या रुग्णांवरील उपचार आणि चाचण्यांबाबतचा अहवाल दैनंदिन तत्वावर संबंधित महापालिकेच्या आरोग्य विभागास सादर करणे बंधनकारक आहे. शिवाय डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्ल्यूमुळे झालेला मृत्यू संशयास्पद वाटल्यास त्याच्या चौकशीसाठी राज्यस्तरीय मृत्यू अन्वेषण समिती स्थापन करण्याची घोषणा आरोग्यमंत्री दीपक सावंत यांनी बुधवारी केली.
मंत्रालयात साथरोग परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी बोलावण्यात आलेल्या तांत्रिक समितीची बैठकीत ते बोलत होते. यंदा ग्रामीण भागात ३१ टक्के तर शहरी भागात सर्वाधिक ६९ टक्के इतके डेंग्यूचे प्रमाण आढळून आले आहे. राज्यात आॅक्टोबर अखेर ५६५३ रुग्ण आढळून आले असून मुंबईमध्ये सर्वाधिक ९४१ तर नाशिक ७७५, पिंपरी-चिंचवड महापालिका क्षेत्र ५९६ रुग्ण आढळून आले आहेत. डेंग्यू संशयित रुग्णांवर खासगी प्रयोगशाळांमध्ये चाचणी केली जाते. तसेच खाजगी रुग्णालयांमध्ये उपचार केले जातात. त्याची माहिती महापालिकांना देणे सक्तीचे करण्यात आले असून सर्व महापालिका आयुक्तांना तसे पत्र पाठविण्यात येणार असल्याचे आरोग्य मंत्र्यांनी यावेळी सांगितले.
डेंग्यू, चिकनगुनिया, स्वाईन फ्ल्यू या आजारांमुळे रुग्ण दगावल्यास काही ठिकाणी संशय व्यक्त केला जातो. रुग्णाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला याबाबत निष्कर्ष काढण्यासाठी राज्यस्तरीय मृत्यू चौकशी समिती स्थापन करण्यात येत असल्याचे डॉ.सावंत यांनी जाहीर केले. राज्यात स्वाईन फ्ल्यूला प्रतिबंध करण्यासाठी लसीकरण मोहिम सुरुच ठेवण्यात येईल. स्वाईन फ्ल्यूच्या चाचण्यांसाठी प्रयोगशाळांनी रुग्णांकडून अव्वाच्यासव्वा रक्कम आकारु नये यासाठी केंद्र शासनाच्या सूचनेप्रमाणे प्रयोगशाळांनी शुल्क आकारणे बंधनकारक असल्याचे आरोग्यमंत्र्यांनी यावेळी स्पष्ट केले. बैठकीस समितीचे अध्यक्ष डॉ. सुभाष साळुंखे, आरोग्य विभागाच्या प्रधान सचिव सुजाता सौनिक, आरोग्य संचालक डॉ. सतीश पवार आदींसह समितीचे सदस्य उपस्थित होते. (प्रतिनिधी)

Web Title: Establishment of inquiry committee for suspicious deaths of dengue

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.