Join us  

स्मॉग टॉवर उभारा; मुंबईकरांना शुद्ध हवेत मोकळा श्वास घेऊ द्या

By ऑनलाइन लोकमत | Published: October 04, 2021 10:28 AM

स्मॉग टॉवरची देखभाल दुरुस्ती फार खर्चिक नाही. याचे फिल्टर पाण्याने देखील साफ करता येतात. यासाठी फार काही कष्ट करावे लागत नाही

सचिन लुंगसेमुंबई : दिल्ली येथे अकरा कोटी रुपये खर्च करून उभारलेले एक स्मॉग टॉवर पुढील पंचवीस वर्षे हवा शुद्ध देण्याचे काम करणार असून, असे स्मॉग टॉवर मुंबईत उभारले गेले तर येथील प्रदूषण कमी होण्यासह मुंबईकरांना शुद्ध हवेत मोकळा श्वास घेता येईल, असा विश्वास टाटा प्रोजेक्टस लिमिटेडचे उपाध्यक्ष संदीप नवलखे यांनी ‘लोकमत’ला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केला.

पथदर्श प्रकल्प कसा राबविला?दिल्ली येथील दिल्ली प्रदूषण नियंत्रण मंडळ यांनी एक समिती स्थापन केली होती. समितीकडून झालेले कामकाज आणि त्यानंतर आम्ही केलेल्या संशोधनानंतर अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पथदर्श प्रकल्प राबविण्यात आला. आम्ही जो प्रकल्प राबविला आहे त्याचे निरीक्षण दिल्ली आयआयटी आणि मुंबई आयआयटी करणार आहे. येथील हवेच्या गुणवत्तेबाबत तपासणी होईल. त्यातून हा प्रकल्प परिणामकारक आहे की नाही याचा निष्कर्ष काढला जाईल.

कसे काम सुरू झाले?दिल्लीमध्ये सर्वाधिक प्रदूषण नोंदविण्यात येते. थंडीत अधिक प्रदूषण नोंदविण्यात येते. पराली जाळल्यामुळे यात आणखी भर पडते. शिवाय वाहनांमुळे प्रदूषणात भर पडते. प्रदूषणाचा स्तर वाढतो. हे प्रदूषण खाली बसते. वर जात नाही. परिणामी परिस्थिती कठीण होते. परिणामी, येथील सरकारने स्मॉग टॉवर उभारण्यासाठी पुढाकार घेतला. त्यानुसार, कर्नाड प्लेस आणि आनंद विहार स्टेशन येथे स्मॉग टॉवर लावण्यात आले आहेत.

देखभाल दुरुस्ती कशी करणार ?स्मॉग टॉवरची देखभाल दुरुस्ती फार खर्चिक नाही. याचे फिल्टर पाण्याने देखील साफ करता येतात. यासाठी फार काही कष्ट करावे लागत नाही. स्मॉग टॉवर दिल्ली सरकार हाताळणार असून, एक स्मॉग टॉवर उभारण्यासाठी अकरा ते बारा कोटी रुपये खर्च येतो. पंचवीस वर्ष स्मॉग टॉवरला काहीच होणार नाही एवढे ते व्यवस्थित असते. महाराष्ट्रात असा एखादा प्रकल्प राबवायचा असल्यास सरकारने पुढाकार घेतला. संवाद साधला तर महाराष्ट्रातही असा प्रकल्प राबविता येईल. यासाठी जागा लागेल. अर्थसंकल्पात तरतूद लागेल.

स्मॉग टॉवर कसे काम करते ?स्मॉग टॉवरची उंची २४ मीटर आहे. रुंदी आणि लांबी २८ मीटर आहे. आरसीसी आणि स्टील बांधकामाद्वारे याची उभारणी करण्यात आली आहे. याद्वारे एका सेंकदात एक हजार क्युबिक मीटर वायू स्वच्छ केला जातो. पाच हजार फिल्टर बसविण्यात आले आहेत. यात हवा वरून घेतली जाते आणि खाली सोडली जाते. वातावरणातील शुद्ध हवा या यंत्राद्वारे खेचून घेतली जाते. खाली जमिनीवर दाबाने सोडली जाते. दाबामुळे ती पसरली जाते. याद्वारे एक किलोमीटर परिसरातील हवा शुद्ध होते.

टॅग्स :वायू प्रदूषण