Join us

पर्यावरणप्रेमींनी सीड बॉम्बनंतर बनविले सीड मोदक

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 1, 2019 03:08 IST

वृक्षलागवडीसाठी पुढाकार । गणपती बाप्पाच्या उत्सवातून मोहिमेद्वारे जनजागृती

ठळक मुद्देसीड मोदकात फळझाडांच्या बिया जास्त टाकण्यात आल्या आहेत.

मुंबई : वाढत्या शहरीकरणामुळे वृक्षतोड मोठ्या प्रमाणात सुरू असते. माणूस आपल्या बुद्धिमत्तेच्या जोरावर पर्यावरणाकडून त्याला हवा तसा विकास साधून घेत आहे. मात्र, परतफेड करण्याचे विसरला आहे. त्यामुळे आज ‘पर्यावरण वाचवा’ असे पर्यावरणप्रेमींचे आर्त आवाहन कानावर पडू लागले आहे. हळूहळू मुंबई व पुण्यासारख्या शहरात नागरिकांना झाडांचे महत्त्व समजू लागले आहे. याचाच ज्वलंत उदाहरण म्हणजे मुंबईमध्ये जलशक्ती अभियानातर्फे मुंबईतील गणेश मंडळामध्ये पर्यावरण संरक्षण व संवर्धनासाठी ‘गोड मोदक कमी खा... आणि सीड मोदक लावा...’ अशी मोहीमच हाती घेण्यात आली आहे.

मिशन ग्रीन मुंबईचे संचालक शुभजीत मुखर्जी यांनी सांगितले की, मुंबईमध्ये ९ हजार ६०० हून अधिक सीड मोदक बनविण्यात आले आहेत. हे सीड मोदक बनविण्यासाठी नऊ संस्था व संघटना, शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी हातभार लावला आहे, तसेच हे सीड मोदक मुंबईतील पाच सार्वजनिक गणेश मंडळांना देण्यात येणार आहेत. बाप्पाच्या दर्शनासाठी येणाऱ्या प्रत्येक भाविकाच्या हातात सीड मोदक देऊन त्यातून वृक्षलागवडीचा संदेश देण्यात येणार आहे. अनंत चतुर्थीपर्यंत एक लाख सीड मोदक बनविण्याचा मानस आहे.मोदकात फळझाडांच्या बिया अधिकसीड मोदकात फळझाडांच्या बिया जास्त टाकण्यात आल्या आहेत. मुंबई शहरात फळझाडांची संख्या कमी असून, जास्तीतजास्त फळझाडांची लागवड करणे आवश्यक आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळामध्ये या सीड मोदकांचे वाटप करून गणेशभक्तांनी सीड मोदक घेऊन आपल्या आजूबाजूच्या परिसरामध्ये लावून त्यातून झाडांची लागवड करावी, असे आवाहन गणेशोत्सवात करण्यात येणार आहे.

बिया रुजवा, पर्यावरण वाचवा...पर्यावरणाचे महत्त्व सर्वसामान्यांच्या लक्षात यावे तसेच पर्यावरणाचे जतन व्हावे यासाठी ‘गोड मोदक कमी खा... आणि सीड मोदक लावा...’ अशी संकल्पनाच राबवण्यात येत आहे. याअंतर्गत मुंबईमध्ये ९ हजार ६०० हून अधिक सीड मोदक बनविण्यात आले असून ते मुंबईतील पाच सार्वजनिक गणेश मंडळांना देण्यात येणार आहेत. याद्वारे जणू मोदकातील बिया रुजवा, पर्यावरण वाचवा... असा संदेश देण्यात येणार आहे.

टॅग्स :मुंबईगणपतीगणेशोत्सव