शहरांनी घोटला पर्यावरणाचा गळा

By Admin | Updated: June 5, 2015 00:42 IST2015-06-05T00:42:45+5:302015-06-05T00:42:45+5:30

सव्वाशे वर्षांपूर्वीच्या राजपत्रात मुंबईचे तापमान २२ ते २५ अंश असल्याचे नमूद केले आहे आणि आज ते ४० अंशांपेक्षाही वर आहे.

Environmental thrust of the city scare | शहरांनी घोटला पर्यावरणाचा गळा

शहरांनी घोटला पर्यावरणाचा गळा

मुंबई : सव्वाशे वर्षांपूर्वीच्या राजपत्रात मुंबईचे तापमान २२ ते २५ अंश असल्याचे नमूद केले आहे आणि आज ते ४० अंशांपेक्षाही वर आहे. शिवाय नेहमीच ३० ते ३५ अंशांच्या आसपास असते. त्यामुळे एकेकाळी थंड हवेचे ठिकाण असलेल्या मुंबईत रोज होणाऱ्या चार हजार मेगावॅट वीजवापरापैकी १ हजार ४०० मेगावॅट वीज वापर एसी म्हणजे वातानुकूलन यंत्राद्वारे होतो. मुंबई असे एकच शहर नाही, तर पुणे, नागपूर, नाशिक, औरंगाबाद ही शहरे प्रदूषणात भर घालत असून, त्याचा विपरीत परिणाम म्हणून पर्यावरणाचा गळा घोटला जात आहे.
मुंबई शहराची वाढती लोकसंख्या आणि वाढत्या लोकसंख्येच्या ताणामुळे प्रदूषणात सातत्याने भर पडत आहे. जल, वायू आणि ध्वनिप्रदूषण प्रामुख्याने होत असून, त्याचा विपरीत परिणाम शहरावर आणि मुंबईकरांवर होतो आहे. मुंबईतील विकासकामांमुळे हिरवळदेखील नष्ट होत असून, आरे कॉलनीमधील हिरवळही आता नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. मुंबईतून रोज ७ हजार ५०० मेट्रीक टन कचरा गोळा होत आहे. ‘निरी’ अहवालानुसार, मुंबईतील वायुप्रदूषणापैकी १९ टक्के प्रदूषण कचरा जाळण्यामुळे होत आहे. ध्वनी आणि जलप्रदूषणाने तर कहर केला असून, मुंबईतील रस्त्यांवर मोटारींची संख्या वाढत असल्याने ध्वनिप्रदूषणात भर पडते.
मुंबईच्या उपनगरात डोंगरालगत झालेल्या विकासकामांमुळे येथील पर्यावरणाची हानी झाली आहे. शिवाय हिरवळ नष्ट झाली आहे. समुद्रकिनारे प्रदूषित झाले असून, खाड्यांतील तिवरांवर अतिक्रमण झाल्याने निसर्गाचा समतोल बिघडला आहे. महत्त्वाचे म्हणजे तापमानवाढ अनियंत्रित झाली असून, हे सगळे थांबवायचे असेल तर आता विकासाचा हव्यास थांबविण्याची गरज आहे, असे पर्यावरणवाद्यांचे म्हणणे आहे. (प्रतिनिधी)

संजय गांधी राष्ट्रीय उद्यान, आरे कॉलनी, विक्रोळी पार्कसाइट, दादर हिंदू कॉलनी, आयआयटी पवई, मलबार हिल, रेसकोर्स, राणीबाग इत्यादी ठिकाणी युरोप, आफ्रिका, आशिया खंडातील अनेक स्थलांतरित पक्षी दाखल होतात. परंतु वाढते शहरीकरण, प्रदूषण आणि इतर अनेक कारणांमुळे स्थलांतरित पक्षी येण्याचे प्रमाण घटले आहे.

देशातील १० पक्षी अधिवासांना धोका आहे. धोका असलेल्या या १० अधिवासांमध्ये महाराष्ट्रातील दोन क्षेत्रांचा समावेश आहे. आणि यात एक अधिवास हा मुंबईतील शिवडी-माहूल खाडी हा आहे, असे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचा अहवाल म्हणतो.

१९८० सालच्या सुमारास वातावरण बदलाचे परिणाम स्पष्टपणे दिसू लागले. १ हजार ५०० शास्त्रज्ञांच्या आंतरराष्ट्रीय अभ्यास गटाने आपल्या चौथ्या आणि अंतिम अहवालात ‘जागतिक तापमानवाढ’ ही वस्तुस्थिती असल्याचे नमूद केले आहे. १७५० सालानंतर कार्बन डायआॅक्साइड आणि उष्णता शोषून घेणारी द्रव्ये व वायू मोठ्या प्रमाणावर वातावरणात सोडण्यात आले आहेत. मानवी कृतीमुळे दरवर्षी एक हजार कोटी टन कार्बन डायआॅक्साइड व तत्सम वायूची भर वातावरणात पडते आहे. १७५० सालाच्या तुलनेत पृथ्वीच्या पृष्ठभागाच्या सरासरी तापमानात सुमारे १.५ अंश सेल्सिअस एवढी वाढ झाली आहे. पृथ्वीवर यापूर्वी आलेल्या सर्वात मोठ्या उष्णयुगात म्हणजे २५ कोटी वर्षांपूर्वी ९० टक्के जीवजाती नाहीशा झाल्या होत्या. मानवनिर्मिती उष्णयुगात या शतकात मानवासह सर्व जीवजाती नाहीशा होतील, अशी भीती व्यक्त केली जाते आहे. मुंबई शहर आणि उपनगरांत मोटारींमुळे शहरात दररोज तब्बल ९०० टन वायुप्रदूषण होत आहे. दुर्दैव म्हणजे उद्योग आणि वाहने हे दोन घटक वायुप्रदूषणात सातत्याने भर घालत असून त्यातील ८० टक्के प्रदूषण हे मोटारींमुळे होत आहे.
- विजय अवसरे, निसर्गमित्र

२०१३ मध्ये पृथ्वीच्या वातावरणातील कार्बनने ४०० पीपीएम ही धोक्याची पातळी गाठली. त्यानंतरच्या वर्षभरात वादळ, हिमवृष्टी, अवर्षण, अतिवृष्टी, हिमनग कोसळणे, हिमनद्या वितळणे इत्यादी घटना घडल्या. ३० मार्च २०१४ रोजी आंतरराष्ट्रीय अभ्यास गटाचा अभ्यास अहवाल प्रकाशित झाला. सर्व देशांना धोरणाबाबत मार्गदर्शन करणाऱ्या या अहवालात तापमानवाढ अनियंत्रित होण्याच्या प्रक्रियेतून आपण जात असल्याची जाणीव करून देऊन मानवजातीच्या अस्तित्वाबाबत चिंता व्यक्त केली गेली. डॉ. जेम्स हॅनसेन यांच्या ‘स्टॉर्म्स आॅफ माय ग्रँडचिल्ड्रन’ या ग्रंथात कार्बनवाढीची गती वर्षाला दोन पीपीएम अशी असून, ४२० पीपीएम ही पातळी गाठण्याच्या काळात तापमानवाढ अनियंत्रित होऊ शकते, असा इशारा दिला.
- अ‍ॅड. गिरीश राऊत, पर्यावरणतज्ज्ञ

वाढते तापमान आणि बाष्पीभवनामुळे ढगफुटी, गारपीट, अतिवृष्टी, वादळे, महापूर, ध्रुवावरील बर्फ वितळणे आदी घटना घडत आहेत. याला आपण जबाबदार आहोत. महत्त्वाचे म्हणजे ५० अंश सेल्सिअसवर मानवी शरीर टिकू शकत नाही. ५५ अंश सेल्सिअसला पाण्याची वेगाने वाफ होते. शिवाय येत्या नऊ वर्षांत तापमानवाढ अनियंत्रित होणार आहे. सागरपातळीची वाढ, बर्फाचे वितळणे, समुद्रातील पाण्याची वाफ अशा अनेक घटनांमुळे पर्यावरणाची हानी होते आहे. आंतरराष्ट्रीय स्तरावर हा प्रश्न चिघळला आहे.
- संजय शिंगे,
पर्यावरणवादी अभ्यासक

Web Title: Environmental thrust of the city scare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.