पनवेलमध्ये नवमतदारांमध्ये उत्साह
By Admin | Updated: October 16, 2014 00:52 IST2014-10-16T00:52:06+5:302014-10-16T00:52:06+5:30
पनवेल मतदार संघात लोकसभेप्रमाणेच यावेळीही नव मतदाराचा उत्साह अधिक दिसत होता. अनेक ठिकाणी तरुण-तरूणींनी मतदानासाठी गर्दी केली होती.

पनवेलमध्ये नवमतदारांमध्ये उत्साह
पनवेल : पनवेल मतदार संघात लोकसभेप्रमाणेच यावेळीही नव मतदाराचा उत्साह अधिक दिसत होता. अनेक ठिकाणी तरुण-तरूणींनी मतदानासाठी गर्दी केली होती. निवडणूक विभागाने उभारलेल्या बुथमुळे बऱ्याचशा अडचणी दूर झाल्या. त्याचबरोबर मतदारांना गैरसोयीला सामोरे जावे लागले नाही. पनवेलमध्ये सर्वाधिक मतदार असल्याने सर्वाचेच लक्ष लागले होते.
पनवेल येथील डीए.व्ही पब्लिक स्कूल, खांदा वसाहतीतील महात्मा स्कूल, संत साईबाबा विद्यामंदीरातील केंद्रला यात्रेचे स्वरूप आले होते. कळंबोली, कामोठे, खारघर येथील मतदान केंद्रांवर बऱ्यापैकी उत्साह दिसत होता. दोन तासात या ठिकाणी १०टक्के मतदान झाले. काही ठिकाणी मतदान यंत्रात तांत्रिक बिघाड झाले मात्र त्वरीत दुरुस्त करण्यात आल्याने मतदान प्रक्रिया ठप्प झाली नाही.
पोलीस उपायुक्त संजयसिंग येणपूरे यांच्या नेतृत्वाखाली कडक पोलीस बंदोबस्त असल्याने कोणताही अनुचित प्रकार घडला नाही. अतिशय खेळीमेळीच्या वातावरणात मतदान पार पडले. ग्रामीण भागात ही मतदानासाठी चांगला प्रतिसाद होता. ठिकठिकाणी मतदारांच्या रांगा लागल्या होत्या निवडणुक विभागाने तयार केलेल्या व्होटर स्लिपमुळे मतदाराची ओळखही पटायला सोपे जात होते. आज सकाळी माजी खासदार रामशेठ ठाकूर यांनी कोपर येथे जावून मतदान केले.
तर आमदार विवेक पाटील , सुनील घरत आणिआमदार प्रशांत ठाकूर यांनी अनुक्रमे नवीन पनवेल आणि पनवेल या ठिकाणी मतदानाचा हक्क बजावला. शेकापक्षाचे नेते बाळाराम पाटील आणि उरण विधानसभा मतदारसंघातील काँग्रेसचे उमेदवार महेंद्र घरत यांनीही न्हावडे आणि शेलघर येथे मतदान केले. सकाळ मतदारांची संख्या कमी होती मात्र बारा वाजल्यानंतर ती वाढत गेली . ग्रामीण भागात चांगले मतदान झाल्याची माहिती निवडणूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिली.
कळंबोली तळोज परिसरातील निवडणुकीच्या दरम्यान अनुचित प्रकार घडू नये यासाठी चोख बंदोबस्त करण्यात आला होता. यावेळी पोलिसांबरोबरच सीआयएसएफ जवान सुद्धा तैनात होते. तळोजातील नावडे, पाचनंद, तळोजा मजकूर या परिसरात मुस्लीम बांधवांनी मोठ्या प्रमाणात मतदान करत आपला अधिकार बजावला.