मॅरेथॉनच्या मार्गात खोदकामांचे गतिरोधक
By Admin | Updated: December 25, 2014 01:20 IST2014-12-25T01:20:15+5:302014-12-25T01:20:15+5:30
दरवर्षी मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या मॅरेथॉनच्या मार्गात खोदलेले रस्तेच गतिरोधक ठरणार आहेत़ त्यामुळे या स्पर्धेच्या मार्गातील विशेषत

मॅरेथॉनच्या मार्गात खोदकामांचे गतिरोधक
मुंबई : दरवर्षी मुंबईत आयोजित करण्यात येणाऱ्या मॅरेथॉनच्या मार्गात खोदलेले रस्तेच गतिरोधक ठरणार आहेत़ त्यामुळे या स्पर्धेच्या मार्गातील विशेषत: मरिन ड्राइव्ह परिसरातील रस्त्यांची कामे या काळात बंद ठेवण्याची गळ आयोजकांनी पालिकेला घातली आहे़ मात्र अशा पद्धतीने रस्त्यांची कामे मोठ्या कालावधीकरिता थांबविण्यास सत्ताधाऱ्यांनी नाराजीचा सूर लावला आहे़ त्यामुळे मॅरेथॉन आयोजकांवरून प्रशासन आणि सत्ताधाऱ्यांमध्ये नवीन वाद पेटण्याची चिन्हे आहेत़
या मॅरेथॉनचे शुल्क थकीत असल्याने पालिका आणि मॅरेथॉन आयोजकांमध्ये वाद रंगला होता़ ही रक्कम माफ करण्यास नगरसेवकांनी विरोध केला होता़ या वर्षी जानेवारी महिन्यात स्पर्धेनंतर सफाई न केल्याप्रकरणी आयोजकांच्या अनामत रकमेतून पैसे कापून घेण्याचा इशारा पालिकेने दिला होता़ १८ जानेवारी रोजी ही मॅरेथॉन पार पडणार आहे़ या स्पर्धेत सहभागी होण्यासाठी देशातूनच नव्हे तर परदेशातूनही अनेक जण येत असतात़ मात्र रस्त्यांची खोदकामे ही त्यात अडथळा ठरणार आहेत. त्यामुळे ही कामे बंद करण्याची विनंती पालिका प्रशासनाला करण्यात आली असल्याचे सूत्रांकडून समजते़ मात्र ही स्पर्धा जागतिक दर्जाची असली तरी रस्त्यांची कामे तीन आठवड्यांसाठी बंद ठेवणे शक्य नसल्याचा सूर स्थायी समिती अध्यक्ष यशोधर फणसे यांनी लावला आहे़ (प्रतिनिधी)