- गौरी टेंबकर - कलगुटकरमुंबई : पतंगाच्या नायलॉन मांजामुळे नामांकित कंपनीत काम करणाऱ्या दीपक म्हाळस (वय ५४ ) या अभियंत्याचा जबडा जिभेसहीत कापला गेल्याचा धक्कादायक प्रकार अंधेरी ब्रिजवर घडला आहे. याप्रकरणी अंधेरी पोलिसांत अद्याप तक्रार दाखल झाली नसून, दोन दिवसांत मांजा विक्रेत्यांवर दोन एफआयआर दाखल करण्यात आल्याचे वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.
तक्रारदार हे दक्षिण मुंबईत राहत असून, ते १४ जानेवारीला दुचाकीने अंधेरी उड्डाणपुलावरून घराच्या दिशेने परतत होते. त्याचवेळी अंधेरी ब्रिजवर उडणाऱ्या मांजामुळे त्यांना दुखापत झाली. हा प्रकार घडल्यावर मी बाईक थांबविली आणि तपासले असता मला तो नायलॉन मांजा असल्याचे आढळले. या मांजाचा वापर करणाऱ्यावर पोलिसांनी कारवाई करावी.
कारण नायलॉन मांजावर बंदी असूनही लोक इतरांचा जीव धोक्यात घालतात. या घटनेत माझा पूर्ण जबडा आणि जीभ जखमी झाली. डॉक्टरांनी माझ्यावर शस्त्रक्रिया केली. सध्या मी प्लास्टिक सर्जनच्या मताची वाट पाहत आहे. घटनेच्या दिवशी मी काहीही बोलू आणि खाऊ शकलो नाही. हे खूप वेदनादायक आहे असे दीपक यांनी नमूद केले.
दरम्यान, तुटलेल्या पतंग उडून अंधेरी ब्रिजवर असलेल्या पोलला अडकतात, तर त्याचा मांजा हा हवेमुळे उडत राहतो. या मांजामुळे ब्रिजवरून येणारे मोटारसायकलस्वार जखमी होतात असे पोलिसांचे म्हणणे आहे.
अद्याप अधिकृत तक्रार नाही...आम्ही बुधवार आणि गुरुवारी मांजा विकणाऱ्या दोघांवर दोन एफआयआर दाखल केले आहेत. यात पतंग उडविणाऱ्यांचा समावेश नाही. तसेच त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात मांजाही ताब्यात घेतला आहे. मात्र, अंधेरी ब्रिजवरील या प्रकरणी कोणतीही तक्रार आम्हाला अद्याप प्राप्त झालेली नाही. रमेश भामे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, अंधेरी