मनोहर कुंभेजकर
मुंबई - डिप्लोमा इंजिनिअरिंग उत्तीर्ण विद्यार्थ्यांना अभियांत्रिकी पदवीकरिता थेट प्रवेश दिला जातो. यावर्षी सदर प्रवेशाच्या ऑनलाईन प्रक्रियेत मोठ्या प्रमाणात घोळ झाला आहे. विद्यार्थ्यांना रात्री एका कॉलेजमध्ये प्रवेश तर सकाळी दुसऱ्या कॉलेजमध्ये प्रवेश, काहींना एकाच वेळी दोन कॉलेजात प्रवेश असा गोंधळ निर्माण झाला आहे. त्यामुळे विद्यार्थी आणि पालकांना नाहक मनस्ताप सहन करावा लागत आहे. त्यामुळेच द्वितीय वर्ष अभियांत्रिकी प्रवेश प्रक्रियेतील घोळाबाबात शिवसेना आक्रमक झाली आहे.
पदवीधर मतदार संघातील शिवसेनेचे आमदार विलास पोतनीस यांनी तंत्रशिक्षण संचालकांची नुकतीच भेट घेऊन याबाबत लवकर कारवाई करण्याची मागणी केली. प्रवेश प्रक्रियेमधील गोंधळामुळे विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही याची खबरदारी तंत्रशिक्षण संचालनालयाने घ्यावी अन्यथा शिवसेना उग्र आंदोलन करेल असा इशारा आमदार विलास पोतनीस यांनी दिला आहे.
तंत्रशिक्षण संचालनालयाचे संचालक डॉ. अभय वाघ यांची आमदार पोतनीस यांनी भेट घेऊन संबधीत सॉफ्टवेयर बनवणारी कंपनी फोर पिलर यांच्यावर कडक कारवाई करावी तसेच या प्रक्रियेत भ्रष्टाचार होत असल्यास चौकशी करावी अशी आग्रही मागणी आपण निवेदनाद्वारे केली असल्याचे लोकमतला सांगितले. या प्रकरणाची चौकशी सुरु असून संबधीत सॉफ्टवेअर कंपनीला कारणे दाखवा नोटिस बजावली आहे. याप्रकरणी योग्य ती कारवाई केली जाईल अशी ग्वाही डॉ. वाघ यांनी दिली.