इंजिन घसरले

By Admin | Updated: May 17, 2014 01:45 IST2014-05-17T01:45:09+5:302014-05-17T01:45:09+5:30

मनसेने मोठा जोर लावून या वेळी ठाण्यातल्या तीन लोकसभा मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते.

Engine collapsed | इंजिन घसरले

इंजिन घसरले

ठाणे : मनसेने मोठा जोर लावून या वेळी ठाण्यातल्या तीन लोकसभा मतदारसंघांत उमेदवार उभे केले होते. त्यासाठी शिवसेनेत नाराज असलेल्या व तिच्या चित्रपट सेनेचे नेतृत्व करणार्‍या अभिजित पानसे यांना अचानक उमेदवारी देऊन सगळ््यांनाच धक्का दिला होता. त्यांच्यासाठी राज यांनी सभांचा धडाकाही लावला. परंतु, मतदारांनी त्यांना साफ नाकारले. कल्याणमध्ये प्रमोद ऊर्फ राजू पाटील यांच्यासारख्या दबंगाला उमेदवारी दिली. प्रचाराचा धडाकाही उडवला. परंतु, तिथेही मतदारांनी मनसेला नाकारले. भिवंडीत सुरेश ऊर्फ बाळ््यामामा म्हात्रे यांना मनसेने उमेदवारी दिली. त्यांचीही डाळ मतदारांनी शिजू दिली नाही. राज यांच्या सभांना गर्दी भरपूर झाली, त्यामुळे मनसेच्या उमेदवारांची हवा देखील होती. परंतु त्यांनी रुग्णशय्येवर असलेल्या शिवसेनाप्रमुखांचा बटाटा वडा आणि सूप काढल्यामुळे मतदारांनी मनसेला धूप घातली नाही. निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी केलेली टोलविरुद्धची खळ्ळखट्याकची नौटंकीही मतदारांना पसंत पडली नाही. या निवडणुकीतील पराभवाने मतदार हे मनसेकडे करमणूक म्हणून व विभागीय पातळीवरचा पक्ष म्हणून पाहतात. राष्ट्रीय राजकारणात तिला फारसे महत्व देत नाहीत, हे स्पष्ट झाले आहे. माझ्याकडे महाराष्ट्राच्या विकासाचा ब्ल्यू प्रिंट आहे, अशी गर्जना करणार्‍या राज यांच्या मनसेला मतदारांनी मनसेच्या पराभवाची रियल प्रिंट दाखविली आहे. केवळ नेत्यांच्या आवाजाच्या नकला करून व धमक्या देणारी विधाने करून व भावनिक मुद्दे उपस्थित करून निवडणूक जिंकता येत नाही, असा धडा राज यांना मतदारांनी शिकविला आहे. राष्ट्रीय स्तरावरचे राजकारण करायचे असेल तर त्यासाठी जी मॅच्युरिटी व सर्वसमावेशकता लागते त्याचा अभाव राज आणि त्यांच्या मनसेत आहे, हे या पराभवामुळे सिद्ध झाले. राज यांचा पक्ष इतका नवीन आहे की, त्याला लोकसभा निवडणुकीत मतदारांनी विजयी करावे एवढा विश्वास अद्याप मतदारांच्या मनात निर्माण करता आलेला नाही. त्यासाठी बराच वेळ जावा लागेल. तसेच मनसेला आपल्या कपाळी बसलेला राजकीय अस्पृश्यतेचा शिक्काही प्रयत्नपूर्वक पुसावा लागेल. युती, आघाडी करणार नाही असे घमेंडीचे राजकारण राज यांना थांबवावे लागेल, असाही इशारा या पराभवात दडलेला आहे.

Web Title: Engine collapsed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.