Join us  

चोक्सीसाठी 'एअर अ‍ॅम्बुलन्स'ची व्यवस्था करु त्याने भारतात यावं; ईडीने दाखल केलं प्रतिज्ञापत्र

By ऑनलाइन लोकमत | Published: June 22, 2019 1:10 PM

चौकशीला सामोरं जाण्यासाठी मेहुल चोक्सी टाळाटाळ करत आहे असा आरोप ईडीने प्रतिज्ञापत्रात केला आहे.

मुंबई - पंजाब नॅशनल बँकेला कोट्यावधीचा रुपयांचा चुना लावून परदेशात पळून गेलेला मेहुल चोक्सीविरोधात ईडीने न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले आहे. या प्रतिज्ञापत्रात लिहिलं आहे की, उपचाराचं कारण देत न्यायालयाची दिशाभूल करुन कारवाईत विलंब करण्याचा प्रयत्न मेहुल चोक्सी करत आहे.  

तसेच चौकशीला सामोरं जाण्यासाठी मेहुल चोक्सी टाळाटाळ करत आहे असा आरोप ईडीने प्रतिज्ञापत्रात केला आहे. चोक्सीने दावा केलाय की, ईडीकडून माझी 6 हजार 129 कोटी रुपयांची जप्त करण्यात आली आहे हे चुकीचं आहे. मात्र प्रत्यक्षात ईडीकडून फक्त 2 हजार 100 कोटींची संपत्ती जप्त करण्यात आल्याचं प्रतिज्ञापत्रात म्हटलं आहे. 

ईडीने न्यायालयाला सांगितले की, अँटिग्वावरुन मेहुल चोक्सीला भारतात आणण्यासाठी हवाई रुग्णवाहिका व्यवस्था करण्यात येईल तसेच भारतात चोक्सीवर आवश्यक ते उपचार करण्यात येतील त्यात वैद्यकीय क्षेत्रातील तज्ज्ञदेखील असतील.

मेहुलने चौकशीदरम्यान कधीही सहाय्य केलं नाही. त्याच्याविरोधात अजामीनपात्र अटकेचे आदेश आहेत. इंटरपोलने त्याच्याविरोधात रेड कॉर्नर नोटीस जारी केले आहे. मात्र त्याने भारतात येण्यास नकार दिला आहे. न्यायालयाने मेहुल चोक्सीला प्रतिज्ञापत्र दाखल करण्याचे निर्देश दिले आहेत ज्यामध्ये आदेशाच्या तारखेपासून एक महिन्याच्या आत त्याला भारतात परत येण्याची इच्छा आहे का हे सांगावे आणि यायचं असेल तर कधी येणार हे निश्चित वेळ सांगावी असं नमूद करण्यात आलं आहे. 

 

काही दिवसांपूर्वी चोक्सीने उच्च न्यायालयात दोन याचिका दाखल केल्या होत्या. ईडीने चोक्सीला ‘आर्थिक फरार गुन्हेगार’ जाहीर करावे, यासाठी विशेष न्यायालयात दाखल केलेल्या अर्जाविरोधात एक याचिका आहे. तर दुसरी ईडीने ज्या साक्षीदारांच्या आधारावर चोक्सीला आर्थिक फरार गुन्हेगार जाहीर केले, त्या साक्षीदारांची उलटतपासणी घेण्याची परवानगी द्यावी, अशी आहे. या दोन्ही याचिका फेटाळाव्यात अशी अशी विनंती ईडीने उच्च न्यायालयाला केली आहे.

‘तो (मेहुल चोक्सी) आर्थिक फरार गुन्हेगार आहे. जाणूनबुजून तपास यंत्रणेपुढे येण्यास टाळत आहे. त्याने ६,०९०७ कोटी रुपयांचा घोटाळा केला आहे. चौकशीसाठी त्याला तपासयंत्रणेने समन्स बजावूनही तो गैरहजर राहिला. तपासकामात ईडीला सहकार्य करणार नाही, असे त्याने सांगितले. विशेष न्यायालयाने त्याच्याविरुद्ध अजामीनपात्र वॉरंटही जारी केले. तरीही तो न्यायालयात हजर राहिला नाही. प्रिव्हेन्शन ऑफ मनी लॉड्रिंग अ‍ॅक्ट अंतर्गत फौजदारी कारवाई टाळण्यासाठी तो देश सोडून फरार झाला. त्याने एंटीगुवा देशाचे नागरिकत्व स्वीकारले. याचाच अर्थ तो भारतात परत येण्यास इच्छुक नाही,’ असे ईडीने प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे. 

टॅग्स :अंमलबजावणी संचालनालयन्यायालय