मास्टर लिस्ट महिना अखेरीस
By Admin | Updated: September 21, 2015 02:27 IST2015-09-21T02:27:36+5:302015-09-21T02:27:36+5:30
मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरात सुमारे ३0-३५ वर्षांपासून खितपत पडलेल्या नागरिकांना म्हाडा महिनाअखेरीस चांगली बातमी देणार आहे.

मास्टर लिस्ट महिना अखेरीस
मुंबई : मुंबई इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळाच्या संक्रमण शिबिरात सुमारे ३0-३५ वर्षांपासून खितपत पडलेल्या नागरिकांना म्हाडा महिनाअखेरीस चांगली बातमी देणार आहे. नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी म्हाडामार्फत काही दिवसांमध्ये मास्टर लिस्ट जाहीर करणार असल्याने संक्रमण शिबिरातील नागरिकांना दिलासा मिळणार आहे.
संक्रमण शिबिरात राहत असलेल्या नागरिकांना हक्काचे घर देण्यासाठी इमारत दुरुस्ती व पुनर्रचना मंडळामार्फत मास्टर लिस्ट तयार करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. ३२४ पात्र रहिवाशांची पात्रता यादी जाहीर करण्याचे काम सुरू असतानाच अनेक अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या. यामुळे मास्टर लिस्ट लांबणीवर गेली आहे. मास्टर लिस्टमध्ये त्रुटी राहू नयेत, यासाठी आर आर मंडळाचे अधिकारी प्रयत्नशील आहेत. सेस प्राप्त इमारतीच्या पुनर्विकासासाठी तेथील नागरिकांना संक्रमण शिबिरात पाठविण्यात येते. त्यानुसार मुंबईतील अनेक सेस प्राप्त इमारतींच्या पुनर्विकासावेळी हजारो रहिवाशांना संक्रमण शिबिरात पाठविण्यात आले आहे. हजारो रहिवासी गेल्या ३0 ते ३५ वर्षांपासून संक्रमण शिबिरात राहत आहेत. मात्र, या रहिवाशांना अद्यापही हक्काचे घर मिळालेले नाही. या रहिवाशांना हक्काचे घर मिळावे यासाठी म्हाडामार्फत मास्टर लिस्ट तयार करण्याचे काम गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. हे काम अंतिम टप्प्यात आले असून, ते या महिन्यात पूर्ण होणार असल्याचे, म्हाडाच्या एका अधिकाऱ्याने सांगितले.
मास्टर लिस्टमध्ये कोणत्याही त्रुटी राहू नयेत, यासाठी म्हाडा प्रयत्नशील असून, लिस्टचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे. हे काम पूर्ण झाल्यानंतर मास्टर लिस्ट जाहीर करण्यात येईल, असेही या अधिकाऱ्याने सांगितले.