वाशी डेपोत फेरीवाल्यांचे अतिक्रमण
By Admin | Updated: February 16, 2015 04:58 IST2015-02-16T04:58:05+5:302015-02-16T04:58:05+5:30
शहरात अनधिकृत फेरीवाल्यांनी मुख्य रस्ते, पदपथ तसेच सार्वजनिक जागांवर आपले बस्तान ठोकले आहे. इतकेच नव्हे, तर
वाशी डेपोत फेरीवाल्यांचे अतिक्रमण
नवी मुंबई: शहरात अनधिकृत फेरीवाल्यांनी मुख्य रस्ते, पदपथ तसेच सार्वजनिक जागांवर आपले बस्तान ठोकले आहे. इतकेच नव्हे, तर आता या फेरीवाल्यांनी एनएमएमटीच्या डेपोकडेही आपला मोर्चा वळविल्याने डेपोतील दळणवळणाला मोठा अडथळा निर्माण झाल्याने याचा प्रत्यक्ष फटका प्रवाशांना बसत
आहे.
वाशी येथे मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या एनएमएमटीच्या डेपोत मागील काही दिवसांपासून फेरीवाल्यांचा उपद्रव वाढला आहे. बस थांब्याच्या मागील मोकळ्या जागेवर अनेकांनी आपले व्यवसाय थाटल्याचे दिसून आले आहे. यात पानाच्या टपऱ्या, पाणी व वडापावचे ठेले, शीतपेयाचे विक्रेते आदींचा समावेश दिसून येतो. तर रात्रीच्या वेळी डेपोच्या अगदी दर्शनीभागातच भुर्जीपाव विक्रेत्यांच्या गाड्या उभ्या असल्याचे पाहावयास मिळते.
विशेष म्हणजे डेपोच्या बाहेरील परिसरात महापालिकेच्या वतीने अपंगांसाठी काही व्यावसायिक स्टॉल्स देवू केले आहेत. मात्र या स्टॉल्सधारकांनीही मोठ्याप्रमाणात अतिक्रमण केल्याने प्रवाशांच्या रहदारीला अडथळा निर्माण होत आहे. डेपोत वाढलेल्या फेरीवाल्यांच्या अतिक्रमणामुळे भिकारी व गुन्हेगारी प्रवृत्तीच्या लोकांचाही या परिसरात वावर वाढल्याचे दिसून येते. या सर्व प्रकारामुळे प्रवासी हैराण झाले आहेत.
यासंदर्भात महापालिका प्रशासनाने तातडीने कारवाई करावी, अशी मागणी प्रवाशांकडून करण्यात येत आहे. दरम्यान, यासंदर्भात महापालिकेच्या अतिक्रमण विभागाचे उपायुक्त सुभाष गायकर यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला असता तो होऊ शकला नाही. (प्रतिनिधी)