नागाव किना-यावर अतिक्रमण
By Admin | Updated: December 19, 2014 23:02 IST2014-12-19T23:02:11+5:302014-12-19T23:02:11+5:30
पर्यटकांचे हॉट डेस्टिनेशन ठरलेल्या नागाव समुद्रकिनारी धनदांडग्यांनी अतिक्रमणे करुन सीआरझेड कायद्याला खुलेआम छेद दिल्याचे दिसून येत आहे

नागाव किना-यावर अतिक्रमण
आविष्कार देसाई , अलिबाग
पर्यटकांचे हॉट डेस्टिनेशन ठरलेल्या नागाव समुद्रकिनारी धनदांडग्यांनी अतिक्रमणे करुन सीआरझेड कायद्याला खुलेआम छेद दिल्याचे दिसून येत आहे. जिल्हा प्रशासन, एमटीडीसी आणि मेरीटाईम बोर्ड या बांधकामांकडे दुर्लक्ष करत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे.
नागाव समुद्रकिनारे पर्यटकांना नेहमीच खुणावत आले आहेत. या ठिकाणी पर्यटकांना आवश्यक असणाऱ्या सोयी-सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी स्थानिकांसह पर जिल्ह्यातील व्यावसायिकांनी हॉटेल, कॉटेज, रेस्टारंट उभारले आहेत. याच समुद्रकिनारी मोठ्या संख्येने विविध उद्योजकांनी जमिनी खरेदी करुन तेथे आपल्या आलिशान इमारती, बंगले उभारले आहेत. समुद्र किनाऱ्यानंतरची जमीन ही सरकारी अथवा एमटीडीसी यांच्या अखत्यारीत असणारी आहे. त्यानंतर असणाऱ्या जमिनीवर धनदांडग्यांनी आलिशान मालमत्ता उभारल्या आहेत. या जागेतून अतिक्रमण करीत रस्ता तयार केला असून किनाऱ्यावरील असणाऱ्या दगडांवर काँक्रीटचे भक्कम पूल बांधले आहेत. समुद्रकिनारी बांधकाम करताना सीआरझेड कायदा आडवा येत असूनही त्याला न जुमानता अशी बांधकामे सर्रास येथे आढळून येत आहेत. यातील एका मालमत्ताधारकाच्या समोरील एमटीडीसीच्या जागेत डोळे दीपविणारे गार्डन बनविले आहे. कायदे धाब्यावर बसवित असेल तर अशा प्रकरणामध्ये संबंधितांवर फौजदारी गुन्हा दाखल करणे गरजेचे आहे, असे निवासी उपजिल्हाधिकारी सतीश बागल यांनी लोकमतशी बोलताना सांगितले.